Asian Games 2023 चे आयोजन चीनमधील हांगझो येथे होत आहे. जिथे भारताने नेमबाजी स्पर्धेत पहिले सुवर्णपदक जिंकले आहे. भारतीय पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल संघाने चीनमध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण जिंकले. पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल संघात रुद्राक्ष बाळासाहेब पाटील, दिव्यांश सिंग पनवार आणि ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर यांचा समावेश आहे. सुवर्णपदक जिंकण्यासोबतच या खेळाडूंनी चीनचा विश्वविक्रमही मोडीत काढला.
चीनचा विश्वविक्रम मोडला
भारतीय नेमबाजांनी वैयक्तिक पात्रता फेरीत एकूण 1893.7 गुण मिळवले, जे चीनने गेल्या महिन्यात बाकू जागतिक चॅम्पियनशिपमध्ये केलेल्या मागील जागतिक विक्रमी गुणांपेक्षा 0.4 गुणांनी जास्त आहे. चीनने या वर्षी 19 ऑगस्ट रोजी झालेल्या बाकू वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 1893.3 गुणांसह विक्रम केला होता. यानंतर चीनने आशियाई रेकॉर्ड्स आणि गेम्स रेकॉर्ड्सच्या चार्टवरही आपले स्थान गमावले. नेमबाजीतील भारताचे हे तिसरे पदक आहे. यापूर्वी भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या दिवशी नेमबाजीत एक रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले होते. त्याचबरोबर भारताच्या खात्यात आता एकूण 7 पदके झाली आहेत. ज्यामध्ये एक सुवर्ण, तीन रौप्य आणि तीन कांस्य पदके आहेत.
टॉप 3 संघांची क्रमवारी
भारत: 1893.7
कोरिया: 1890.1
चीन: 1888.2
पात्रता फेरीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला रुद्राक्ष 632.5 गुणांसह संघाची पसंती ठरला. ऐश्वर्या 631.6 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. तर दिव्यांशचा अंतिम स्कोअर629.6 होता आणि तो 8व्या स्थानावर राहिला. तिघांनीही वैयक्तिक फेरीच्या अंतिम फेरीसाठी चांगली कामगिरी केली आणि तिघांचेही स्कोअर त्यांना अंतिम फेरीत नेण्यासाठी पुरेसे चांगले होते, परंतु दिव्यांश वैयक्तिक पदक गमावेल कारण NOC मधील केवळ दोन नेमबाज अंतिम फेरीत पोहोचू शकतील.