Asia Cup 2023: टीम इंडिया बनली चॅम्पियन, श्रीलंकेचा 10 गडी राखून केला पराभव

0
WhatsApp Group

India vs Sri Lanka Final: 2023 आशिया कपच्या अंतिम सामन्यात मोहम्मद सिराजने ऐतिहासिक कामगिरी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. सिराजच्या घातक गोलंदाजीपुढे श्रीलंकेच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. रविवारी झालेल्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात सिराजने 6 बळी घेत भारताला आठव्यांदा आशिया चषकाचे विजेतेपद मिळवून दिले. भारताने अंतिम सामना अवघ्या 6.1 षटकांत जिंकला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सिराजच्या घातक गोलंदाजीसमोर श्रीलंकेचा संघ अवघ्या 50 धावांत गडगडला. वनडे फायनलमधील कोणत्याही संघाची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. यानंतर शुभमन गिल आणि इशान किशन सलामीला आले आणि 263 चेंडू शिल्लक असताना टीम इंडियाने 10 विकेट्स राखून विजय मिळवला.

भारताने विक्रमी आठव्यांदा आशिया कप जिंकला. या सामन्यात मोहम्मद सिराजने अनेक मोठे विक्रम केले. विजेतेपदाच्या लढतीत सिराजने एका षटकात चार विकेट घेत श्रीलंका संघाचे कंबरडे मोडले. यासह सिराज एका षटकात चार विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला.

भारताने अंतिम सामना अवघ्या 37 चेंडूत जिंकला

प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने अंतिम सामन्यात टीम इंडियाला केवळ 51 धावांचे लक्ष्य दिले होते. भारतीय संघाने हे माफक लक्ष्य एकही विकेट न गमावता अवघ्या 37 चेंडूत पूर्ण केले. शुभमन गिल 19 चेंडूत 27 धावा करून नाबाद परतला आणि इशान किशन 18 चेंडूत 23 धावा करून नाबाद माघारी परतला. गिलने 6 चौकार मारले तर ईशानने 3 चौकार मारले.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर श्रीलंकेचा संघ अवघ्या 15.2 षटकांत 50 धावांत गारद झाला. भारताविरुद्ध कोणत्याही विरोधी संघाची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 6 बळी घेतले. याशिवाय हार्दिक पांड्याने तीन आणि जसप्रीत बुमराहने एक विकेट घेतली.

भारतीय वेगवान गोलंदाजांच्या घातक गोलंदाजीसमोर श्रीलंकेचे 9 खेळाडू दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत. केवळ कुसल मेंडिस 17 आणि दुशान हेमंथा 13 यांना दुहेरी आकडा गाठता आला. तर पथुम निसांका 02, कुसल परेरा 00, सदिरा समरविक्रम 00, चरित असलंका 00, धनंजय डी सिल्वा 04, दासुन शनाका 00, डुनिथ वेललागे 08 आणि प्रमोद मधुशन 01 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले.

अंतिम सामन्यात सिराजसमोर श्रीलंकेचे फलंदाज हतबल दिसत होते. विशेष म्हणजे श्रीलंकेच्या सर्व 10 विकेट भारताच्या वेगवान गोलंदाजांनी घेतल्या. आशिया चषकाच्या इतिहासात हे दुसऱ्यांदा घडले आहे, जेव्हा वेगवान गोलंदाजांनी सर्व 10 विकेट घेतल्या आहेत. यापूर्वी याच स्पर्धेच्या साखळी फेरीत पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भारताविरुद्ध ही कामगिरी केली होती.