Asia Cup Hockey: 58 मिनिटांपर्यंत आघाडी असतानाही टीम इंडियाला विजय मिळवता आला नाही

WhatsApp Group

आशिया चषक हॉकी स्पर्धेमध्ये Asia Cup Hockey गतविजेत्या टीम इंडियाने आपल्या मोहिमेची सुरुवात ड्रॉ ने केली आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारताला India vs Pakistan १-१ असे बरोबरीत रोखले आहे. तिसऱ्या क्वार्टरपर्यंत म्हणजेच ४५ मिनिटांपर्यंत टीम इंडिया १-० ने आघाडीवर होती. चौथ्या क्वार्टरला ५८ मिनिटे झाली असतानाही स्कोअर १-० असा भारताच्या बाजूने होता. यानंतर, शेवटच्या एका मिनिटात (59व्या) पेनल्टी कॉर्नरवर पाकिस्तानने गोल दागत १-१अशी बरोबरी साधली.

हाफ टाइमपर्यंत भारतीय संघ पाकिस्तानवर 1-0 अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. मात्र, कोणत्याही संघाला गोल करण्यात यश आले नाही. 16व्या मिनिटाला पाकिस्तानने गोल करण्याची संधी गमावली. भारताचा गोलरक्षक सूरज करकेराने शानदार सेव्ह केले. 21व्या मिनिटाला भारतीय संघाला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण त्याचा फायदा संघाला करता आला नाही. 28व्या मिनिटाला पाकिस्तानला पेनल्टी कॉर्नरही मिळाला, पण भारताचा गोलरक्षक सूरजने बचाव केला.

तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंना एकही गोल करता आला नाही. तिसऱ्या क्वार्टरमध्ये 31व्या मिनिटाला पाकिस्तानला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण रिझवान अलीचा ड्रॅग फ्लिक भारतीय खेळाडूंनी रोखला. टीम इंडियाला 37व्या मिनिटाला चांगली संधी मिळाली. त्यानंतर पवन राजभरने टॉमहॉकच्या शानदार शॉटने गोल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पाकिस्तानी गोलरक्षकाने तो शॉट रोखला.

42 व्या मिनिटाला पाकिस्तानच्या एजाज अहमदने बॉक्समधून काउंटर अ‍ॅटॅक करण्याचा प्रयत्न केला, पण त्याची संधी हुकली. 44व्या मिनिटाला भारतीय संघाला आठवा पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण त्याचाही फायदा टीम इंडियाला करता आला नाही. भारतीय संघाने केवळ एका पेनल्टी कॉर्नरवरून गोल केला. चौथ्या क्वार्टरमध्ये पाकिस्तानी खेळाडूंनी प्रतिआक्रमण सुरू केले. 46व्या मिनिटाला भारताचा गोलरक्षक सूरज कारकेरा याने अमाद बटचा फटका अप्रतिमपणे रोखला. 59व्या मिनिटाला पाकिस्तानला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पाकिस्तानच्या ड्रॅग फ्लिकवर गोलपोस्टजवळ उभ्या असलेल्या अब्दुल राणाने गोल स्कोअर 1-1 असा बरोबरीत आणला. अशाप्रकारे टीम इंडियाचा विजय हुकला.