Asia Cup 2022 : या पाकिस्तानी खेळाडूने ठोकले सर्वाधिक षटकार, जाणून घ्या टॉप 5 मध्ये किती भारतीय फलंदाज

Asia Cup 2022 Record : आशिया कप 2022 27 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. पहिला सामना ब गटातील दोन संघ श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात 28 ऑगस्टला सामना होणार आहे. या दोन्ही संघांचा अ गटात समावेश आहे. आशिया चषकाचे रेकॉर्ड पाहिल्यास त्यात भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू स्पर्धा करताना दिसतात. यामध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम शाहिद आफ्रिदीच्या नावावर आहे.
आफ्रिदी हा पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू आहे. आशिया कपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. आफ्रिदीने या स्पर्धेत 26 षटकार मारले आहेत. तर श्रीलंकेचा माजी खेळाडू सनथ जयसूर्या या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 23 षटकार मारले आहेत. या बाबतीत भारतीय कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या स्थानावर आहे. रोहितने 21 षटकार मारले आहेत. पहिल्या पाच खेळाडूंच्या यादीत तीन भारतीयांचा समावेश आहे.
रोहितने आशिया कपमध्ये आतापर्यंत 27 सामने खेळले असून यादरम्यान त्याने 21 षटकारांच्या मदतीने 883 धावा केल्या आहेत. या स्पर्धेत त्याने एक शतक आणि 7 अर्धशतके केली आहेत. सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत सुरेश रैना चौथ्या क्रमांकावर आहे. रैनाने 18 सामन्यात 18 षटकार मारले आहेत. तर महेंद्रसिंग धोनी पाचव्या स्थानावर आहे. त्याने 24 सामन्यात 16 षटकार मारले आहेत. यादरम्यान धोनीने 690 धावा केल्या आहेत. या स्पर्धेत त्याने एक शतक आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत.