
Asia Cup 2022: यूएईमध्ये खेळल्या जात असलेल्या आशिया कपमध्ये टीम इंडियाला अंतिम फेरी गाठणं कठीण झालं आहे. सुपर 4 मध्ये आधी पाकिस्तान आणि नंतर श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पराभवानंतर टीम इंडिया आशिया कपमधून बाहेर होण्याच्या मार्गावर पोहोचली आहे. टीम इंडियाला अजूनही फायनलमध्ये पोहोचण्याची संधी आहे पण त्यासाठी इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. मात्र, आशिया चषकाचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होऊ शकत नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
7 सप्टेंबर रोजी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यानंतर अंतिम शर्यतीत भारताच्या टिकेबाबत चित्र स्पष्ट होऊ शकते. अफगाणिस्तानच्या संघाने पाकिस्तानला पराभूत केले तर भारताची अंतिम फेरी गाठण्याची शक्यता कायम आहे.
8 सप्टेंबरला भारताचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. भारताला हा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल कारण आता नेट रनरेटचा प्रश्न त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा बनला आहे. यानंतर 9 सप्टेंबरला होणाऱ्या सामन्यात श्रीलंकेचा संघ पाकिस्तानला पराभूत करू शकतो की नाही यावरही भारताला अवलंबून राहावे लागेल.
पाकिस्तानसोबत फायनल होणार नाही
9 सप्टेंबरला श्रीलंकेने पाकिस्तानला हरवले आणि भारताचा नेट रनरेट पाकिस्तान आणि अफगाणिस्तानपेक्षा जास्त असेल तर भारत अंतिम फेरीत पोहोचू शकतो. असे घडण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. मात्र आता अंतिम फेरीत आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होऊ शकत नाही. आशिया चषक स्पर्धेत भारताने आपल्या प्रवासाची सुरुवात अतिशय शानदार पद्धतीने केली. पाकिस्तान आणि हाँगकाँगला पराभूत करून भारताने ग्रुप स्टेजमध्ये अव्वल स्थान पटकावले. पण सुपर 4 मध्ये भारताला पाकिस्तान आणि श्रीलंकेकडून दारूण पराभवाला सामोरे जावे लागले.