मुंबई : राज्याचा सर्वोच्च ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार गेली सात दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या पद्मविभूषण आशा भोसले यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुक्रवार २४ मार्च, २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता गेट वे ऑफ इंडिया येथे होणाऱ्या एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर आदी उपस्थित राहणार आहेत.कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्र भूषण पुरस्काराने राज्य शासनाच्या वतीने गौरविण्यात येते. सन २०२१ या वर्षीचा पुरस्कार आशा भोसले यांना प्रदान करण्यात येईल
या कार्यक्रमप्रसंगी ‘आवाज चांदण्याचे’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून गायक सुदेश भोसले, साधना सरगम, ऋषिकेश कामेरकर, आर्या आंबेकर, बेला शेंडे, मधुरा दातार हे गायक कलाकार आशा भासले यांच्या सदाबहार गीतांचा कार्यक्रम सादर करतील. अभिनेते सुमीत राघवन हे या कार्यक्रमाचे निवेदन करतील. हा कार्यक्रम सर्व रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य असून शिवाजी नाट्यमंदिर, दादर, दामोदर हॉल, परळ, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरीवली, दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले, काशिनाथ घाणेकर नाटयगृह, ठाणे, वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल, आचार्य अत्रे नाट्यगृह, कल्याण, गडकरी रंगायतन, ठाणे, विष्णूदास भावे नाट्यगृह, वाशी या नाट्यगृहावर कार्यक्रमाच्या सन्मानिका प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश या तत्वावर उपलब्ध आहेत. या पुरस्कार समारंभास तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.