भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या प्रकृतीबाबत एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. ९२ वर्षीय ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ११ एप्रिल २०२६ रोजी ही घटना घडली असून, या बातमीने संपूर्ण चित्रपटसृष्टी आणि त्यांचे लाखो चाहते हादरले आहेत.
ब्रीच कँडी रुग्णालयात पचार सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, आशा ताईंना आज अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना त्वरित रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयाचे डॉक्टर मने यांनी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सध्या त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. मात्र, अद्याप रुग्णालयाकडून अधिकृत ‘हेल्थ बुलेटिन’ जारी करण्यात आलेले नाही, त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत नेमकी काय स्थिती आहे, हे अद्याप अस्पष्ट आहे.
सिनेसृष्टीत चिंतेचे वातावरण आणि चाहत्यांची प्रार्थना
आशा भोसले यांच्या प्रकृती बिघडल्याचे वृत्त समजताच मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयाबाहेर माध्यमांची आणि चाहत्यांची मोठी गर्दी जमली आहे. चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे. गेले ७ दशकांहून अधिक काळ आपल्या सुमधुर आवाजाने जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या आशा ताईंची प्रकृती लवकर सुधारावी, यासाठी देशभरातून देवाकडे साकडे घातले जात आहे.
कुटुंबाकडून मौन, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
रुग्णालयाबाहेर पापाराझी आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित असले तरी, भोसले कुटुंबातील सदस्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. प्रकृतीबाबतची गुप्तता पाळली जात असल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे सावट अधिक गडद झाले आहे. मात्र, चाहत्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि केवळ अधिकृत माहितीची प्रतीक्षा करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
