शिष्यावर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा

WhatsApp Group

आसाराम बापूला शिष्यावर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गुजरातच्या गांधीनगर कोर्टाने आसारामला एक दिवस आधीच दोषी ठरवलं होतं. 2013 मध्ये आसारामविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या जोधपूर तुरुंगात बंद असलेला 81 वर्षीय आसाराम 2013 मध्ये राजस्थानमधील त्याच्या आश्रमात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आणखी एका प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. शिक्षेवरील युक्तिवाद ऐकल्यानंतर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी.के.सोनी यांनी हा निकाल दिला.

अहमदाबादच्या चांदखेडा पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या एफआयआरनुसार, आसारामने 2001 ते 2006 दरम्यान सुरतमधील महिलेवर अनेकदा बलात्कार केला, जेव्हा ती शहराच्या बाहेरील मोटेरा येथील त्याच्या आश्रमात राहत होती. याप्रकरणी न्यायालयाने सोमवारी आसारामला दोषी ठरवले होते.

फिर्यादीचे म्हणणे ग्राह्य धरून न्यायालयाने आसारामला कलम 376 (2) (सी), 377 (अनैसर्गिक लैंगिक संबंध) आणि भारतीय दंड संहितेच्या बेकायदेशीर कैदेसह इतर अनेक संबंधित कलमांखाली दोषी ठरवले. आसारामच्या पत्नीसह अन्य सहा आरोपींची पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती.