
‘असानी’ चक्रीवादळाची तीव्रता आग्नेय आणि लगतच्या पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरामध्ये(Bay of Bengal) तीव्र चक्री वादळात (cyclone) आली आहे. अशा स्थितीत पुढचे २४ तास खूप धोक्याचे असणार असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) रविवारी ही माहिती दिली.
सध्याची परिस्थिती पाहता हे चक्रीवादळ आता विशाखापट्टणमपासून ९४० किमी आणि ओडिशातील पुरीपासून १ हजार किमी अंतरावर असल्याचे समजते आहे. चक्रीवादळ १० मे रोजी पश्चिम बंगालमध्ये येण्याची शक्यता असल्यामुळे बंगालमध्ये ‘हाय अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी त्यांचा जिल्हा दौरा पुढे ढकलला आहे.
दरम्यान, दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरावरील चक्रीवादळ तीव्र होत वायव्य दिशेला सरकला आणि रविवारी संध्याकाळी 5.30 वाजता आग्नेय आणि लगतच्या पूर्व मध्य बंगालच्या उपसागरावर मध्यवर्ती झाले आहे. हवामान खात्याने सांगितले की, मंगळवारी म्हणजेच 10 मे रोजी उत्तर आंध्र-ओडिशा किनार्यावरून ‘असानी’ पश्चिम-मध्य आणि लगतच्या वायव्य-पश्चिम बंगालच्या उपसागरात पोहोचेल आणि ओडिशाच्या किनारपट्टीपासून उत्तर-पूर्व आणि उत्तर-पश्चिम बंगालकडे वळेल.