“तुम्ही चार नव्हे, तर आठ मुले जन्माला घाला, तुम्हाला कोण अडवतंय?” नवनीत राणांच्या विधानावर ओवेसींचा खोचक टोला

WhatsApp Group

अकोला: लोकसंख्येच्या मुद्द्यावरून देशातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. भाजप नेत्या नवनीत राणा यांनी हिंदूंना जास्त मुले जन्माला घालण्याचे आवाहन केल्यानंतर, एमआयएम (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. अकोला येथे आयोजित एका सभेत बोलताना ओवेसी यांनी नवनीत राणा यांचे नाव न घेता त्यांच्या विधानाचा समाचार घेतला आणि “तुम्हाला आठ मुलं जन्माला घालण्यापासून कोणी रोखलंय?” असा खोचक सवाल केला.

नेमकं प्रकरण काय?

काही दिवसांपूर्वी नवनीत राणा यांनी एका विधानाद्वारे हिंदू समुदायाला आवाहन केले होते की, “काही लोकांच्या अनेक पत्नी आणि अनेक मुलं असतात, ज्यामुळे त्यांची लोकसंख्या सतत वाढत आहे. भारताच्या रक्षणासाठी हिंदूंनी किमान तीन ते चार मुलं जन्माला घातली पाहिजेत.” राणा यांनी पुढे असेही म्हटले होते की, “हे लोक उघडपणे सांगतात की त्यांच्या चार पत्नी आणि १९ मुलं आहेत, मग आपण मागे का राहायचे?”

ओवेसींचे चोख प्रत्युत्तर

राणा यांच्या या विधानाचा संदर्भ देत ओवेसी म्हणाले, “माझी सहा मुलं आहेत आणि आता माझी दाढीही पांढरी होत आहे. कोणीतरी म्हणतंय की चार मुलं असायला हवीत. चारच का? तुम्ही आठ मुलं पैदा करा, तुम्हाला कोणी रोखलंय का?” ओवेसी यांनी आपल्या भाषणात केवळ नवनीत राणाच नव्हे, तर सरसंघचालक मोहन भागवत आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याही अशाच प्रकारच्या जुन्या विधानांची आठवण करून दिली.

राजकीय प्रोपोगंडा की लोकसंख्या नियंत्रण?

राजकीय वर्तुळात अनेकदा विशिष्ट समुदायाची लोकसंख्या वाढत असल्याचा दावा करून दुसऱ्या समुदायाला जास्त मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले जाते. मात्र, तज्ज्ञांच्या मते हे केवळ राजकीय प्रोपोगंडाचे भाग आहेत. उलट, लोकसंख्या कमी असल्यास मुलांना चांगले शिक्षण, आरोग्य आणि विकासाच्या संधी मिळतात. देशाच्या वाढत्या लोकसंख्येच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वच समुदायांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे मत अभ्यासक व्यक्त करत आहेत.