मुझफ्फरनगरमध्ये तरुणाच्या पोटातून बाहेर काढले तब्बल 63 स्टीलचे चमचे, डॉक्टरही थक्क

WhatsApp Group

ऑपरेशन दरम्यान पोटातून ट्यूमर, दगड बाहेर काढण्याच्या अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. पण, एखाद्याच्या पोटात स्टीलचा चमचा आल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे. तेही एक-दोन नव्हे तर 63. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधून असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोटदुखीच्या तक्रारीवरून रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाच्या पोटातून चमचे बाहेर येत असल्याचे पाहून डॉक्टरही अचंबित झाले. सध्या रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मुझफ्फरनगर जिल्ह्यातील मन्सूरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील बोपाडा गावात राहणाऱ्या 40 वर्षीय विजयला पोटदुखीचा त्रास होत होता. त्यांच्या तक्रारीवरून त्यांना मुझफ्फरनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता पोटात एक वस्तू होती. डॉक्टरांनी विजयच्या कुटुंबीयांना सांगितले की लगेच ऑपरेशन करावे लागेल. कुटुंबीयांच्या संमतीनंतर विजयवर शस्त्रक्रिया करण्यात आली. ऑपरेशन थिएटरमध्ये जेव्हा डॉक्टरांनी त्याच्या पोटात चीर टाकून ती वस्तू काढली तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

विजयच्या पोटात अनेक स्टीलचे चमचे होते. डॉक्टरांनी एक एक करून त्याच्या पोटातून 63 चमचे काढले. तब्बल 4 तास डॉक्टरांनी विजयवर शस्त्रक्रिया केली. डॉक्टरांनी या ऑपरेशनचा व्हिडिओही बनवला आहे. ऑपरेशननंतरही विजयची प्रकृती चिंताजनक आहे. डॉक्टरांनी सांगितले की, अशी केस आम्ही प्रथमच पाहिली आहे. कोणी इतके चमचे का खाईल असा प्रश्न ते करत आहेत.

याप्रकरणी विजयचा पुतण्या अखिल चौधरी याने सांगितले की, विजयला ड्रग्जचे व्यसन होते. व्यसनमुक्तीसाठी त्याला शहरातीलच व्यसनमुक्ती केंद्रात पाठवण्यात आले. तेथील कर्मचाऱ्यांनी विजयला जबरदस्तीने चमचे खाऊ घातल्याचा आरोप अखिलने केला आहे.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा