आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम अजून वाढला!

WhatsApp Group

मुंबई – ड्रग्ज प्रकरणात आर्थर रोड तुरुंगात असलेल्या आर्यन खानला आजही जामीन मिळालेला नाही. मुंबई उच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी गुरुवारपर्यंत पुढे ढकलली आहे. उद्या दुपारी 2.30 वाजता या प्रकरणी पुन्हा एकदा सुनावणी  करण्यात येणार आहे.

कोर्टात आर्यनचे वकील मुकुल रोहतगी यांनी आर्यनला चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आलं असल्याचं कोर्टात म्हटलं आहे. त्याला जामीन मिळाल्यानंतरही या प्रकरणाचा तपास सुरू राहू शकतो. आज सुनावणीच्या सुरुवातीला अरबाज मर्चंटचे वकील अमित देसाई यांनी युक्तिवाद केला. त्यांनी नोटीस न देता आरोपींना केलेली अटक ही चुकीची असल्याचे सांगितले.

याआधी मंगळवारी, एनसीबीने आर्यनच्या जामिनाला विरोध केला होता की, तो बाहेर आल्यावर साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतो. आर्यनची बाजू मांडताना मुकुल रोहतगी यांनी एनसीबीचा म्हणनं नाकारलं आणि आर्यनला निर्दोष म्हटले आहे. मंगळवारीच आर्यनचा मित्र अरबाज मर्चंटच्या वकिलानेही कोर्टासमोर आपली बाजू मांडली होती.


आज या खटल्यातील आणखी एका आरोपीचे वकील मुनमुन धमेचा आपली बाजू मांडणार असून अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग एनसीबीच्या वतीने तिघांच्या जामिनाला विरोध करताना आपली बाजू मांडणार आहेत. आर्यनला 2 ऑक्टोबरला जहाजातून पकडण्यात आले होते. तो 8 ऑक्टोबरपासून आर्थर रोड कारागृहात कैद आहे.

मंगळवारीच एनडीपीएस कोर्टाने याच प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मनीष गढियान आणि अवीन साहू या दोन आरोपींना जामीन मंजूर केला. दोघांनाही ड्रग्ज पॅडलिंगच्या आरोपाखाली पकडण्यात आले होते. मनीषकडून 2.5 ग्रॅम ड्रग्जही जप्त करण्यात आले आहे. त्याच्या जामिनानंतर आता आर्यनच्या जामिनाचा मार्ग मोकळा होताना दिसत आहे.

एनसीबीने मंगळवारी दिलेल्या लेखी जबाबात या प्रकरणाच्या तपासात छेडछाड करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटले आहे. शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी साक्षीदारांना भेटून तपासावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे.

एनसीबीच्या म्हणण्यानुसार, प्रभाकर सेलने 23 ऑक्टोबर 2021 रोजी दाखल केलेल्या कथित प्रतिज्ञापत्राने हे स्पष्ट केले आहे की तपासावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. एनसीबीचे म्हणणे आहे की, सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी होण्यापूर्वी कोणत्याही न्यायालयात असे कागदपत्र का दाखल करण्यात आले नाही. हे प्रतिज्ञापत्र गोपनीयपणे दाखल केले गेले आणि नंतर ते प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रकाशित आणि प्रसारित केले गेले.

यापूर्वी आर्यनचा जामीन अर्ज विशेष एनडीपीएस कोर्ट आणि किला कोर्टाने दोन वेळा फेटाळून लावला आहे. जामीन फेटाळताना न्यायालयाने म्हटले होते की, आर्यन सतत ड्रग्जशी संबंधित कारवायांमध्ये गुंतलेला दिसत आहे. एनडीपीएस कोर्टाने आपल्या निकालात म्हटले होते की, व्हॉट्सअॅप चॅटद्वारेही आर्यन ड्रग्ज पुरवठादाराच्या संपर्कात असल्याचे दिसून येते.