Delhi Assembly Election : पुढील वर्षी दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी राजकीय पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. दरम्यान, तिहार तुरुंगातून बाहेर आलेले अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर काँग्रेसने दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीसोबत युती करण्याबाबत मोठी घोषणा केली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली मोठी घोषणा
दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र यादव यांनी रविवारी सांगितले की, काँग्रेस दिल्ली विधानसभा निवडणूक एकट्याने लढणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस कोणत्याही पक्षासोबत युती करणार नाही. अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधत त्यांनी राजीनामा देण्याची ऑफर म्हणजे राजकीय नाटक असल्याचे म्हटले आहे. दिल्लीत काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने एकत्रितपणे लोकसभा निवडणूक लढवली होती.
ते म्हणाले की, “दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चार महिन्यांपूर्वी राजीनामा दिला असता, तर दिल्लीत पाणी साचल्यामुळे ३० हून अधिक निष्पाप जीवांचे नुकसान झाले नसते. दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र यादव म्हणाले, दोन दिवस का वाट पाहत आहेत? सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच त्यांच्यावर निर्बंध घातले असल्याने हे राजकीय नाटक असल्याचे दिसते. लवकरात लवकर नवीन मुख्यमंत्री नेमावा. दिल्लीतील जनता जागरूक आहे आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीत ते नक्कीच याचे उत्तर देतील.”
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल काय म्हणाले?
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, “दोन दिवसांनी मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहे. मनीष सिसोदिया हे देखील मुख्यमंत्री होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ते आणि सिसोदिया जनतेत जाणार आहेत.” ते म्हणाले की, “विधानसभा निवडणुकीपर्यंत पक्षाचा दुसरा कोणीतरी नेता मुख्यमंत्री होईल.”