गोव्यात नोकरी न मिळाल्यास ३ हजार रुपये बेरोजगार भत्ता देणार, केजरीवालांची घोषणा

WhatsApp Group

गोवा – आम आदमी पक्षाच्या प्रचारासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या गोव्यात आहेत. गोव्यात केजरीवाल यांनी ‘आप’चे सरकार आल्यास सर्व स्थानिक युवकांना रोजगार देऊ आणि ते देऊ शकलो नाही तर प्रत्येकाला 3000 रुपये बेरोजगार भत्ता देण्याची मोठी घोषणा केली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, आम आदमी पार्टी स्वतंत्र भारतातील सर्वात प्रामाणिक पार्टी आहे. स्वतः पंतप्रधान मोदींनी आम्हाला प्रामाणिकपणाचे प्रमाणपत्र दिले आहे.


पीएम मोदींनी माझ्या आणि मनीष सिसोदिया यांच्यावर छापे टाकले. आमच्या 21 आमदारांना अटक करण्यात आली आणि 400 फाईल्स तपासण्यात आल्या पण आमच्या विरोधात एकही पुरावा सापडला नाही. मुळात आम्ही भ्रष्टाचार करतच नाही, त्यामुळे आमच्याविरुद्ध पुरावे मिळणारच नाहीत. जर गोव्यात आमचे सरकार आले तर आम्ही प्रामाणिकपणे सरकार चालवून येथील लोकांचा विकास करू, असंही ते म्हणाले.


केजरीवाल म्हणाले की, गोव्यात भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकच झाले आहेत. काँग्रेसचे सर्व लोक आपला पक्ष सोडून भाजपमध्ये गेले आहेत. सध्याच्या गोव्याच्या परिस्थितीला सर्वच पक्ष जबाबदार आहेत. अशा स्थितीत आम आदमी पक्षामुळे स्थानिक लोकांमध्ये नवी आशा निर्माण झाली आहे.

दिल्लीतील आमच्या सरकारने शैक्षणिक क्षेत्रात मोठं काम केलं आहे. गोव्यातही आमचं सरकार स्थापन झाल्यास येथेही आम्ही चांगली शिक्षण व्यवस्था उपलब्ध करून देऊ, असं आश्वासनही केजरीवाल यांनी यावेळी दिलं आहे.