आयपीएल २०२६ च्या हंगामात आतापर्यंत संमिश्र कामगिरी करणाऱ्या अर्शदीप सिंगने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात आपला ‘रुद्रावतार’ दाखवला आहे. वानखेडे स्टेडियमवर मुंबईच्या फलंदाजांची दाणादाण उडवत अर्शदीपने आयपीएलमध्ये आपल्या १०० बळींचा टप्पा पूर्ण केला आहे. ही कामगिरी करणारा तो पंजाब किंग्सच्या इतिहासातील पहिलाच गोलंदाज ठरला आहे.
एकाच षटकात दोन मोठे धक्के
मुंबई इंडियन्सची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. डावाचे तिसरे षटक टाकण्यासाठी आलेल्या अर्शदीप सिंगने पहिल्याच चेंडूवर रयान रिकेल्टनला बाद केले. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याने मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. सलग दोन चेंडूंत दोन बळी घेत अर्शदीपने मुंबईला बॅकफूटवर ढकलले. विशेष म्हणजे, पॉवरप्लेच्या २ षटकांत त्याने केवळ ४ धावा खर्च करून २ महत्त्वाचे बळी टिपले.
पंजाब किंग्ससाठी ऐतिहासिक १०० विकेट्स
अर्शदीप सिंगने या सामन्यात आपल्या १०० विकेट्सचा टप्पा ओलांडला असून आता त्याच्या नावावर १०१ बळी झाले आहेत. पंजाब किंग्ससाठी १०० बळी घेणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी कोणत्याही गोलंदाजाला पंजाबसाठी ही किमया साधता आली नव्हती.
खास क्लबमध्ये अर्शदीपची एन्ट्री
आयपीएलमध्ये १०० बळी घेणारा अर्शदीप हा एकूण ३१ वा गोलंदाज, तर १९ वा वेगवान गोलंदाज ठरला आहे. तसेच, १०० बळींचा टप्पा पार करणारा तो आयपीएल इतिहासातील फक्त पाचवा डावखुरा (Left-arm) वेगवान गोलंदाज आहे. या यादीत तो आता ट्रेंट बोल्ट (१४४), जयदेव उनादकट (११४), आशिष नेहरा (१०६) आणि झहीर खान (१०२) यांसारख्या दिग्गजांच्या रांगेत जाऊन बसला आहे.
