मुंबई – भाजप आमदार गणेश नाईक यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होणार आहे. त्यांच्यावर एका महिलेने बलात्काराचे आरोप केले आहेत. दीपा चौहान असे या महिलेचे नाव असून त्यांनी यासंबंधित महाराष्ट्र महिला आयोगाकडे तक्रार आहे. याचीच दाखल घेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी गणेश नाईक यांना अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.
याप्रकरणी मिळालेल्या तक्रारीनंतर रुपाली चाकणकर म्हणाल्या की, ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात एका पीडित महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर दोन दिवसांनी या पीडित महिलेने प्रत्यक्ष भेट देऊन आपल्यासोबत घडलेली सर्व घटना महिला आयोगाला सांगितली आहे.
यामध्ये पीडितेने जी तक्रार राज्य महिला आयोगाकडे दिली, याची दखल घेऊन मुंबई पोलिसांना यासंबंधित तपास करून याप्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार तपास करत असताना पोलिसांनी गणेश नाईक यांच्याविरोधात 506 ब हा गुन्हा दखल केला आहे.
16 तारखेला नेरुळ पोलीस ठाण्यामध्ये 376 हा गुन्हा दखल केला. हे दोन्ही गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यामुळे 376 हा बलात्काराचा गुन्हा गणेश नाईक यांच्यावर दाखल झाला असताना, पोलिसांनी गणेश नाईक यांना अटक करावी, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत. तसेच याचा अहवाल राज्य महिला आयोगाकडे सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.