अज्ञात वाहनाच्या धडकेत येवला तालुक्यातील भारतीय लष्कराच्या जवानाचा जागीच मृत्यू

0
WhatsApp Group

येवला :-  अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत भारतीय लष्कराच्या जवानाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना निफाड तालुक्यातील जामापूर येथे बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास लासलगाव-येवला रस्त्यावर घडली. याप्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, येवला तालुक्यातील सावरगाव येथील भारतीय लष्करातील जवान सागर नवनाथ पानमळे वय 30 बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ते आपल्या गावाकडे जात असताना निफाड तालुक्यातील जामापूर शिवार लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांच्या बुलेट मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिली. या जवानाचा जागीच मृत्यू झाला.

अज्ञात वाहन व चालक फरार आहेत. याप्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात अद्याप एक जण जखमी असल्याचे समजते. सागर पानमळे यांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.

भारतीय लष्करात कार्यरत सागर पानमळे यांच्या मृत्यूवर येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांनी शोक व्यक्त केला आहे. “आपल्या येवला तालुक्यातील सावरगावचे सुपुत्र भारतीय लष्करातील वीर जवान सागर पानमळे यांना वीरगती प्राप्त झाली. सावरगाव सारख्या छोट्याश्या गावातून पुढे येऊन त्यांनी शिक्षण पूर्ण केले. देशसेवेची आवड असल्याने त्यासाठी कठोर मेहनत घेऊन ते भारतीय सैन्यदलात रुजू झाले. भारतीय सैन्यदलात त्यांनी अतिशय उत्तम अशी सेवा बजावली. त्यांच्या निधनाने भारतमातेने वीर सुपुत्र गमावला आहे. मी व माझे कुटुंबीय पाणमळे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो.”