मुंबई इंडियन्स सचिन तेंडुलकरला वाढदिवशीच देणार का अर्जुनच्या पदार्पणाचं ‘बेस्ट बर्थडे गिफ्ट’?

WhatsApp Group

यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघ विजयाचे खाते उघडण्यासाठी धडपड करत आहे. स्पर्धा सुरू झाल्यापासून सातच्या सात सामन्यामध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. आज मुंबईचा आठवा सामना होणार आहे. याच हंगामामध्ये आधी एकदा पराभूत झालेल्या लखनौ सुपर जायंट्स विरूद्ध (MI vs LSG) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी ७.३० वाजता सामना रंगणार आहे.

मुंबई संघासाठी आजचा दिवस खूप खास आहे. कारण संघाचे मार्गदर्शक आणि महान खेळाडू सचिन तेंडुलकर आज ४९ वर्षांचा झाला आहे. या निमित्ताने मुंबईचा संघ सचिनला वाढदिवसाची खास भेट देऊ शकतो. सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आज लखनौ विरुद्धच्या सामन्यामध्ये मुंबईकडून पदार्पण करू शकतो. आपल्या वाढदिवशी आपल्या मुलाचे IPL पदार्पण होणे, ही सचिनसाठी बेस्ट गिफ्ट नक्कीच असू शकते.

यंदाच्या हंगामात विजयासाठी आसुसलेल्या मुंबई संघाच्या प्लेइंग-११ मध्ये आज बदल होऊ शकतो. कर्णधार रोहित शर्मा गोलंदाजीत हा बदल करू शकतो. जयदेव उनाडकटच्या जागी अर्जुन तेंडुलकरचा संघात समावेश करू शकतो. तसं झालं तर अर्जुनचा हा IPLमधील पदार्पण सामना असेल.

मुंबई इंडियन्सचा संघ – रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), डेव्हॉल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, हृतिक शोकीन, जयदेव उनाडकट/अर्जुन तेंडुलकर, डॅनियल सॅम्स, रिले मेरेडिथ, जसप्रीत बुमराह.

लखनौ सुपर जायंट्सचा संघ – लोकेश राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), मनीष पांडे / कृष्णाप्पा गौतम, दीपक हुडा, कृणाल पांड्या, आयुष बडोनी, मार्कस स्टॉयनीस, जेसन होल्डर, दुष्मंथा चमिरा, आवेश खान आणि रवी बिश्नोई.