दिग्गजांना मागे टाकत मेस्सीने सातव्यांदा जिंकला ‘बॅलन डी’ओर’

WhatsApp Group

अर्जेंटिनाचा महान फुटबॉल खेळाडू लियोनेल मेस्सीला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी पुन्हा एकदा बॅलोन डी’ओर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. या वर्षी लियोनेल मेस्सीने पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तायानो रोनाल्डो आणि बायर्न म्युनिकचा दिग्गज रॉबर्ट लेवानडॉस्कीला मागे सारत सातव्यांदा बॅलोन डी’ओर पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात हा पुरस्कार मेस्सीला प्रदान करण्यात आला आहे.

लियोनेल मेस्सीने यापूर्वी 2009, 2010, 2011, 2012, 2015 आणि 2019 मध्ये बॅलोन डी’ओर पुरस्कार जिंकला होता. मेस्सी नंतर ख्रिस्तायानो रोनाल्डोने सर्वाधिक वेळा बॅलोन डी’ओर पुरस्कार पटकावला आहे. पोर्तुगालचा महान फुटबॉलर रोनाल्डोने 2008, 2013, 2014, 2016 आणि 2017 मध्ये हा पुरस्कार आपल्या नावावर केला होता. मेस्सीला विक्रमी सातव्यांदा बॅलोन डी’ओर पुरस्कार मिळाल्यानंतर पूर्ण क्रीडाविश्वातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


या दोन खेळाडूंनंतर मार्को व्हॅन बास्टेन, जोहान क्रुफ आणि मायकेल प्लॅटिनी यांनी प्रत्येकी तीन वेळा हा बॅलोन डी’ओर पुरस्कार जिंकला आहे. तर रोनाल्डो नाझारियो, फ्रेंच बेकनबॉअर, अल्फ्रेडो डी स्टेफानो, केविन कीगन, कार्ल हेन्झ यांनी प्रत्येकी दोनदा बॅलोन डी’ओर हा पुरस्कार जिंकला आहे.


रॉबर्ट लेवानडॉस्कीला सर्वोत्कृष्ट स्ट्रायकर म्हणून गौरवण्यात आले असून बॅलन डी’ओर पुरस्कार जिंकल्याबद्दल मेस्सीचे त्याने अभिनंदन केले आहे. या पुरस्कारासाठी मेस्सीकडे सर्वाधिक 613 गुण होते, लेवानडॉस्की 580 गुणांसह दुसऱ्या स्थानी राहिता तर तिसऱ्या स्थानी राहिलेल्या जोर्गिनोच्या खात्यात 460 गुण होते. तर रोनाल्डो 178 गुणांसह सहाव्या स्थानी राहिला. अ‍ॅलेक्सिया पेटुलासला (Alexia Putellas) या वर्षीचा महिलांचा बॅलोन डी’ओर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

फ्रेंच फुटबॉल मॅगझिन Ballon d’Or हा पुरस्कार दरवर्षी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या फुटबॉलपटूला दिला जातो. सर्वप्रथम हा पुरस्कार 1956 मध्ये फुटबॉलपटू स्टॅनली मॅथ्यूजला देण्यात आला होता.