
मुंबई – राज्य मंत्रिमंडळात आज खूप मोठा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीमध्ये औरंगाबाद शहराच्या संभाजीनगर नामकरणास मान्यता देण्यात आली आहे. औरंगाबाद शहराचा नामकरणाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. भाजप आणि मनसेकडून नामकरणाच्या मुद्द्यावरुन अनेकदा महाविकास आघाडी सरकारला घेरण्यात आलं आहे. त्यामुळे अखेर महाविकास आघाडी सरकारकडून याबाबतचा आज निर्णय घेण्यात आला आहे.
विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या 50 आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे हे ठाकरे सरकार कोसळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाची ही शेवटची बैठक असल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने औरंगाबाद नामकरणाचा निर्णय घेतल्याची चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे फक्त औरंगाबादच नाही तर उस्मानाबाद शहराचं देखील धाराशीव नामकरणास मान्यता देण्यात आली आहे. तसेच नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. ठाकरे सरकारचे महाराष्ट्राच्या इतिहासातील हे सर्वात मोठे निर्णय मानले जातील.