
सिंधुदुर्ग : चिपी विमानतळावरून सध्या सुटत असलेल्या विमानासोबतच 18 ऑगस्टपासून आणखी एका विमानाचे उड्डाण होणार आहे. पर्यटनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा विकासाला चालना देण्यासाठी येथून अजून विमानाची सोय करण्यात यावी.अशी मागणी आपण केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे काही महिन्यांपूर्वी केली होती . त्या मागणीला यश आले असून चाकरमान्यांसाठी ही आनंदाची बातमी असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितलं आहे.
कणकवली येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. नितेश राणे म्हणाले , चिपी विमानतळावरून 70 आसनी एक विमान उड्डाण करीत होते . परंतु खऱ्या अर्थाने सिंधुदुर्गातील पर्यटन वाढवायचे असेल तर अजून एखाद्या तरी विमानाचे उड्डाण चिपी येथून व्हावे. अशी विनंती आपण केंद्रीय मंत्र्यांना केली होती. त्यानुसार आता गणेशोत्सवासाठी हे विशेष विमान सोडण्यात येणार आहे.
18 ऑगस्टपासून या विमान उड्डाणाला सुरूवात होणार आहे. 18 ऑगस्ट पासून सोडण्यात येणारे विमान हे दुपारी 3 वाजता मुंबईहून सुटणार असून 4.30 वाजता चिपी येथे पोहोचणार आहे . तर 4.45 वाजता मुंबईच्या दिशेने झेप घेणार असून सायंकाळी सहा वाजता मुंबईला पोहोचणार आहे . त्यामुळे जिल्ह्यात येणारे चाकरमानी व नागरिकांची गैरसोय बऱ्यापैकी दूर होणार आहे.