ENG vs NZ : लॉर्ड्समधील पराभवानंतर न्यूझीलंडला आणखी एक धक्का, ‘हा’ खेळाडू दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर

इंग्लंड (England) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना इग्लंडने जिंकला. त्यामुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये (World Test Championship) इंग्लंडच्या गुणांमध्ये वाढ झाली आहे. मात्र या पराभवामुळे कसोटी स्पर्धेतील न्यूझीलंडचे संकट आणखी वाढले आहे. त्यातच न्यूझीलंडचा अष्टपैलू कॉलिन डी ग्रँडहोम (Colin de Grandhomme) याला दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे त्याला इंग्लंडसोबत सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील उर्वरित सामन्यांमधून त्याला बाहेर पडावे लागले आहे. त्यामुळे पुढील सामन्यात न्यूझीलंड आपले कमबॅक कसे करते आणि इंग्लंडचा पराभव करते का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
लॉर्ड्स (Lords) कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ग्रँडहोमच्या टाचेला दुखापत झाली. 35 वर्षीय ग्रँडहोमला आता दुखापतीतून सावरण्यासाठी 10 ते 12 आठवड्याचा कालावधी लागेल. कॉलिन डी ग्रँडहोमच्या जागी आता अष्टपैलू मिचेल ब्रेसवेलचा उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी न्यूझीलंड संघात समावेश करण्यात आला आहे.
ग्रँडहोमनं लॉर्ड्स टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये 50 बॉलमध्ये 42 रनची खेळी केली होती. टीमला सर्वाधिक आवश्यकता असताना त्याने हा झुंजार खेळ केला. लॉर्ड्स टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये न्यूझीलंडची अवस्था 6 आऊट 36 अशी झाली होती. त्यावेळी ग्रँडहोमनं ही खेळी करत टीमला 132 रनपर्यंत पोहचवलं. त्यानंतर त्यानं इंग्लंडच्या पहिल्या इनिंगमध्ये जो रूटची महत्त्वाची विकेट घेतली. दुसऱ्या इनिंगमध्ये मात्र तो दुखापतीमुळे चौथी ओव्हर पूर्ण करू शकला नाही.
ग्रँडहोम लॉर्ड्स टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये पहिल्याच बॉलवर रन आऊट झाला. लॉर्ड्स इतिहासात गेल्या 43 वर्षांमध्ये एखादा बॅटर गोल्डन डकवर रन आऊट होण्याचा हा दुसराच प्रसंग आहे. यापूर्वी 1979 साली टीम इंडियाचे के. व्यंकटराघवन पहिल्याच बॉलवर रन आऊट झाले होते.