Actress Death; सिनेसृष्टीला आणखी एक धक्का; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचं झालं निधन

WhatsApp Group

Sulochana Latkar: सिनेजगतातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचं निधन झालं आहे. ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्री सुलोचना लाटकर यांची तब्येत खूपच खालावली, त्यानंतर त्यांना दादरच्या सुश्रुषा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आता सुलोचना यांचे निधन झाल्याची बातमी समोर येत आहे.

सुलोचना लाटकर या गेल्या काही महिन्यांपासून श्वसनाच्या आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्यावर बराच काळ रुग्णालयात उपचार सुरू होते. सुलोचना यांच्या मृत्यूला त्यांच्या सुनेने दुजोरा दिला आहे. त्यांचे पार्थिव उद्या सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत त्यांच्या प्रभादेवी निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मार्चमध्येही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही बाब कळताच त्यांनी अभिनेत्रीच्या उपचारासाठी मदत केली होती. मार्चमध्ये सुलोचना लाटकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुलोचना दीदींच्या उपचाराचा सर्व खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय मदत निधीतून करण्याचे निर्देश दिले होते. सुलोचना लाटकर यांनी आजवर अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘मराठा तितुका मेळावा’, ‘मोलकरीण’, ‘बाळा जो रे’, ‘सांगते ऐका’, ‘सासुरवास’, ‘वहिनी ची बांगड्या’ या त्यांच्या गाजलेल्या मराठी चित्रपटांचा समावेश आहे. यासोबतच सुलोचना यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर या 94 वर्षांच्या आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये अमिताभ यांच्या आईची भूमिका साकारली आहे. या चित्रपटांमध्ये ‘रेश्मा और शेरा’, ‘मजबूर’ आणि ‘मुकद्दर का सिकंदर’ या चित्रपटांचा समावेश आहे. यासोबतच त्यांनी दिलीप कुमार आणि धर्मेंद्र यांच्यासोबतही काम केले आहे. अमिताभ बच्चन यांनीही त्यांच्या ब्लॉगमध्ये अनेकवेळा त्यांचा उल्लेख केला आहे. सुलोचना लाटकर यांनी सुमारे 250 हिंदी आणि 50 मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्या त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या.