मोठी बातमी, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक!

WhatsApp Group

मुंबई – वसुली प्रकरणात मोठी कारवाई करत ईडीने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केली आहे. 12 तासांच्या चौकशीनंतर देशमुखांना ईडीच्या एकाही प्रश्नाला समाधानकारक उत्तर देता आलं नाही. अशा स्थितीत त्यांना अटक करण्यात आली असून आता त्यांना न्यायालयात हजर करण्याची तयारी सुरू आहे.

अनिल देशमुख सोमवारी सकाळी 11.55 ला स्वत: ईडी कार्यालयात पोहोचले. त्यांना यापूर्वी अनेकवेळा ईडीने समन्स बजावले होते, परंतु ते चौकशीला उपस्थित राहिले नव्हते, मात्र सोमवारी ते स्वतः ईडी कार्यालयात पोहोचले आणि चौकशीला सामोरे गेले. ईडीने देशमुख यांची 12 तास चौकशी केली. पण एकाही प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देशमुखांना देता आलं नसल्याने त्यांना अटक करण्यात आली. महाराष्ट्राच्या माजी गृहमंत्र्यांनी तपासात सहकार्य केले नाही, असे ईडीने स्पष्टपणे नमूद केले आहे.


अटकेपूर्वी अनिल देशमुख यांचा जबाब नोंदवण्यात आल्याचेही समजले आहे. या गुन्ह्यात सक्रिय योगदान देणाऱ्या सर्व आरोपींचे जबाबही देशमुख यांच्यासमोर ठेवण्यात आले होते. मात्र देशमुखांना कोणत्याच प्रश्नाचं उत्तर स्पष्टपणे देता आले नाही. ते फक्त आरोप फेटाळत राहिले. पण तपासाच्या आधारे ईडीने त्यांना अटक केली.

ज्या प्रकरणात अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली आहे, त्याच प्रकरणात माजी गृहमंत्र्यांच्या पत्नी आणि मुलाचीही चौकशी होणार आहे. त्यांना दोन वेळा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे, मात्र ते अद्याप आलेले नाही.

या प्रकरणाबाबत बोलायचे झाले तर मार्चमध्ये परमबीर सिंग यांना मुंबई पोलिस आयुक्तपदावरून हटवण्यात आले होते. त्यांना होमगार्डचे डीजी करण्यात आले. यानंतर परमबीर सिंह यांचे एक पत्र समोर आले, जे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते. अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना सचिन वाझे यांच्याकडे दरमहा १०० कोटींची मागणी केल्याचा दावा त्यांनी या पत्रात केला होता. यासोबतच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या बदल्यात पैसे घेतल्याचा आरोपही देशमुख यांच्यावर आहे.


देशमुख यांनी सर्व आरोप खोटे असल्याचे सांगितले होते, मात्र त्यांच्याविरुद्ध चौकशी सुरू करण्यात आली होती. यापूर्वी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून केला जात होता, परंतु नंतर जेव्हा मनी लाँड्रिंगचा प्रकरण समोर आलं तेव्हा ईडीनेही तपास सुरू केला. आता ईडीने देशमुख यांना अटक केली आहे.