Rajya Sabha Election 2022: ‘मविआ’ला मोठा झटका; अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना मतदानाची परवानगी कोर्टाने नाकारली

मुंबई – राज्यसभा निवडणुकीला (Rajya Sabha Election 2022) अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. या निवडणुकीमध्ये सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असल्यामुळे एक-एक मत खूप महत्त्वाचे आहे. सर्वच पक्ष लहान पक्षांचे आमदार (small political parties) आणि अपक्षांना (Independent MLA’s) आपल्या गळाला लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन आमदार हे अटकेत आहेत. त्यामुळे या आमदारांनाही निवडणुकीमध्ये मतदान करण्याची परवानगी मिळावी यासाठी न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे.
या याचिकेवर नुकतीच मुंबई सत्र न्यायालयामध्ये सुनावणी झाली. कोर्टाने अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करण्याची परवानगी नाकारली आहे. महाविकास आघाडीसाठी हा एक मोठा झटका आहे.
नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जाला ईडीने विरोध दर्शवला होता. कैद्यांना मतदानाचा अधिकारच नाहीय असा दावाही ईडीने न्यायालयात केला. बुधवारी (8 जून) दिवसभराच्या युक्तिवादानंतर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाने आपला निकाल राखून ठेवला. त्यानंतर गुरुवारी न्यायाधीशांनी आपला निर्णय दिला आहे.