अनिकेत विश्वासरावविरुद्ध पत्नीने केला प्राणघातक हल्ला आणि शारीरिक अत्याचाराचा आरोप!

WhatsApp Group

पुणे – प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेता अनिकेत विश्वासराव (Aniket Vishwasrao) याच्याविरुद्ध अलंकार पोलीस ठाण्यात धक्कादायक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत विश्वासराववर आपल्या पत्नीवर प्राणघातक हल्ला आणि मानसिक व शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे (domestic violence case). या संदर्भात अनिकेतची पत्नी स्नेहा अनिकेत विश्वासराव (Sneha Chavan ) (वय 29, रा. करिश्मा सोसायटी, कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेने मराठी चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. अनिकेतने पोस्टर बॉईज, मस्का, बस स्टॉप यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

आपल्यापेक्षा आपल्या पत्नीचे नाव मोठे होईल या भीतीने अनिकेतने आपल्या पत्नीचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. तसेच लोकांसमोर मारहाण आणि अत्याचार केल्याचं स्नेहाने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. या तक्रारीनंतर अनिकेत विश्वासराव आणि त्याच्या कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिकेत विश्वासराव हा मूळचा मुंबईचा असून त्याचे आणि स्नेहा चव्हाणचे 2018 मध्ये लग्न झाले होते. स्नेहा देखील एक अभिनेत्री आहे आणि तिने काही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता. स्नेहाने अलंकार पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.