बारामती – अठरा महिन्यांच्या बालकाने अनावधानाने चाव्यांचा जुडगा गिळल्याचा धक्कादायक प्रकार भिगवण परीसरामध्ये घडला आहे. त्यानंतर अत्यवस्थ झालेल्या बालकाला बारामतीच्या श्रीपाल हॉस्पिटलात दाखल करण्यात आले. या बालकावर बारामतीच्या डॉक्टरांनी तत्परतेने अवघ्या अर्ध्या तासामध्ये ‘ब्रॉन्कोस्कोपी’ करीत श्वासनलीकेच्या वर अडकलेला चाव्यांचा जुडगा बाहेर काढला.
आरुष अतुल गुणवरे (वय १८ महिने) असे या बाळाचे नाव आहे. चाव्यांचा जुडगा गिळल्यानंतर आरुषला प्रथम भिगवण येथील दवाखान्यामध्ये = नेण्यात आले. तेथील डॉ. त्रिंबक मोरे, डॉ गाढवे यांनी तातडीने डॉ मुथा यांच्याशी संपर्क साधत त्याला बालरुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. अत्यवस्थ अवस्थेत त्याला श्रीपाल रुग्णालयामध्ये आणण्यात आले.
आरुषला रुग्णालयात आणल्यावर त्याच्या तोंडातून रक्त आणि लाळ बाहेर येत होती. त्याचा जीव गुदमरण्यास सुरवात झाली होती. डॉ.राजेंद्र मुथा, डॉ.सौरभ मुथा यांनी परीस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत तातडीने उपचार सुरु केले. त्याने गिळलेला चाव्यांचा जुडगा नाकाच्या मागे श्वासनलीकेच्या वरच्या बाजूस अडकल्याचे डॉ. मुथा यांनी केलेल्या तपासणीत दिसून आलं.
त्यानंतर डॉ. मुथा यांनी तातडीने कान नाक घशाचे डॉ. वैभव मदने, भुलतज्ञ डॉ.अमर पवार यांना संपर्क साधत हा प्रकार सांगितला. त्यानंतर दोघे डॉक्टर रुग्णालयात पोहचले. आरुषला भुल देत दुर्बिणीद्वारे ‘ब्रॉन्कोस्कोपी’ करीत चाव्यांचा जुडगा बाहेर काढण्यात आला. अवघ्या अर्ध्या तासात डॉक्टरांनी यशस्वी उपचार दिल्यामुळे आरुषला जीवदान मिळाले.