
कर्नाटकातील बिदर येथे झालेल्या भीषण रस्ता अपघातात सात महिलांचा मृत्यू झाला असून 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री उशिरा ट्रक आणि ऑटो रिक्षामध्ये समोरासमोर धडक झाली. त्यानंतर हा भीषण अपघात झाला. कर्नाटकातील बिदरमधील एका गावातून महिला रात्री उशिरा ऑटोरिक्षाने घराकडे जात असल्याचे सांगण्यात येत आहे. या महिला व्यवसायाने मजूर असल्याचे सांगितले जाते, त्या दिवसभर काम करून गावाकडे परतत होत्या. बिदरमधील बेमलाखेडा सरकारी शाळेजवळ ही घटना घडली.
स्थानिक पोलिसांचे म्हणणे आहे की, रात्री उशिरा या महिला ऑटो रिक्षातून काम संपवून घरी परतत होत्या. त्यानंतर बेमलाखेडा शासकीय शाळेजवळ रिक्षा ट्रकला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की रिक्षाचा चक्काचूर झाला. सात महिलांचा मृत्यू झाला आहे. पार्वती (40), प्रभावती (36), गुंडम्मा (60), यदम्मा (40), जगम्मा (34), ईश्वरम्मा (55) आणि रुक्मिणीबाई (60) अशी त्यांची नावे आहेत.
दोन्ही वाहनांच्या चालकासह 11 जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. ज्यामध्ये दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.