मुंबई : दहीहंडी उत्सव व प्रो-गोविंदा लीग स्पर्धेत मानवी मनोरे रचताना होणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर 75 हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.
मंत्री संजय बनसोडे म्हणाले की, दहिहंडी उत्सव, प्रो. गोविंदा लीगमधील सहभागी गोविंदांना मानवी मनोरे रचताना अपघात, दुर्घटना होण्याची शक्यता असते. त्यातूनच काही गोविंदांना अपघात होऊन, गोविंदांचा मृत्यू घडून येण्याची किंवा त्यांना गंभीर दुखापत होण्याची शक्यता निर्माण होते.
यासाठी शासन निर्णय 18 ऑगस्ट, 2023 नुसार विमा संरक्षण उपलब्ध करून दिलेल्या 50,000 गोविदांव्यतिरिक्त अतिरिक्त आणखी 25,000 गोविंदांना विमा संरक्षण उपलब्ध करुन देण्याकरीता ओरिएन्टल इन्शुरन्स विमा कंपनीला प्रति गोविंदा 75 रुपये विमा हप्ता याप्रमाणे एकूण रु.18 लाख 75 हजार इतका निधी अदा करण्यासाठी दहीहंडी समन्वय समिती या संस्थेस वितरित करण्यास मान्यता देण्यात आली असल्याचे सांगितले.