बॉलिवूडच्या ‘मोगँबो’चा विमा एजेंट ते खलनायकापर्यंतचा रंजक प्रवास

0
WhatsApp Group

क्रुरता, धुर्तता, फसवणूक, लोभ अशा दुर्गुणांवर आधारित हिंदी चित्रपटसृष्टीत खलनायकाचं पात्र रंगवलं जातं. ‘बुराई पर अच्छाई की जीत’, या संकल्पनेतून आजवर अनेक चित्रपट तयार झाले. अशा स्टोरीलाईन असलेल्या चित्रपटात हिरोप्रमाणेच खलनायकालाही बरोबरीचं स्थान आहे. प्रसंगी हिरोलाही भारी पडणाऱ्या खलनायकाची दमदार पात्र अमरिश पुरी यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटात साकारली आहेत.

पहाडी आवाज, कसदार अभिनय आणि दमदार व्यक्तिमत्वानं खलनायकच्या पात्राला नव्या उंचीवर नेणाऱ्या अमरिश पुरी यांनी १२ जानेवारी २००५ मध्ये वयाच्या ७२ व्या वर्षी ब्रेन हेमरेजमुळे जगाचा निरोप घेतला. पंजाबमध्ये २२ जून १९३२ साली जन्मलेल्या अमरिश यांनी वयाच्या चाळीशीत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आपल्या जीवंत अभिनयानं त्यांनी अनेक पात्र पडद्यावर रंगवली, मात्र, खरी लोकप्रियता त्यांना खलनायकाच्या पात्रामुळेच मिळाली.

अमरिश यांच्या खलनायकाच्या पात्राची दहशत इतकी की त्यांच्या लहान मुलांचे मित्र घरी यायला घाबरायची. आपल्या कारकिर्दीत अमरिश यांनी तब्बल ४०० चित्रपट केले. १९८७ साली आलेल्या मिस्टर इंडियामधील त्यांचं ‘मोगँबो’ हे पात्र आजही लोकप्रिय आहे. ‘मोगँबो खुश हुआ’ हा डॉयलॉग तर आजही आपसुकच अनेकांच्या ओठांवर येतो. त्याकाळात अमरिश सर्वात महागडे खलनायक होते. बॉलिवूडच्या या खलनायकाला त्यांच्या पहिल्या स्क्रीन टेस्टमध्ये नापास करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी काही काळ ईएसआईसीमध्ये काम करत असतानाच थिएटर आर्टिट्स म्हणूनही काम केलं. ५० च्या दशकातील प्रसिद्ध खलनायक मदन पुरींचे अमरिश लहान भाऊ होते.

शाहरुख खान आणि काजोलच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ मधील त्यांचा ‘जा सिमरन जी ले अपनी जिंदगी’ हा डॉयलॉग आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. ‘बादशाह’, ‘कोयला’, ‘करण-अर्जुन’, ‘गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं होतं.१९८६ साली श्रीदेवींच्या ‘नगिना’ चित्रपटात अमरिश पुरींनी बाबा भैरवनाथ या मांत्रिकाची भूमिका साकारली होती. बदल्याच्या ईर्षेनं पेटलेलं हे मांत्रिकाचं पात्र चित्रपट समिक्षकांच्या कौतुकास उतरलं होतं. ‘लोहा’ या चित्रपटात धर्मेंद्र आणि शत्रृघ्न सिन्हा या हिरोंच्या नाकात दम करणारं शेरा हे पात्र प्रेक्षकांच्या आठवणीत आजही जिवंत आहे. राकेश रोशन यांच्या ‘करण-अर्जुन’मध्ये त्यांनी वठवलेल्या ठाकुर दुर्जन सिंहच्या पात्राची दहशत प्रेक्षकांमध्ये कायम आहे. २००१ साली आलेल्या ‘नायक’ चित्रपटातील त्यांची मुख्यमंत्र्यांची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या चित्रपटालाही उत्तम प्रतिसाद लाभला होता.

बँकेत झाली जोडीदाराशी भेट…

बॉलिवडमध्ये प्रस्थापित अभिनेता होण्यापूर्वी अमरिश पुरींनाही संघर्ष करावा लागला. विमा एजेंट म्हणून काम करण्याआधी काही काळ त्यांनी बँकेत नोकरी केली. याच ठिकाणी त्यांची ऊर्मिला दिवेकर यांच्याशी भेट झाली. पुढे त्यांच्यात प्रेम फुललं आणि दोघांनी लग्नगाठ बांधली.

– समीर आमुणेकर