नवनीत राणा आणि रवी राणांना मुंबई पोलिसांनी केली अटक

WhatsApp Group

मुंबई – खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना मुंबईच्या खार पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे आणि सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी ही अटकेची कारवाई केल्याचं सांगण्यात येत आहे.

तत्पूर्वी, राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानाहून ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यामध्ये आणलं. अटकेनंतर आता त्यांना आजची रात्र पोलीस ठाण्यामध्येच काढावी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच राणा दाम्पत्यांना उद्या कोर्टात हजर केलं जाणार आहे.

दरम्यान, नवनीत राणा आणि रवी राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचं कारण देत हनुमान चालीसा न म्हणण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयानंतर त्यांच्यावर शिवसेनेच्या नेत्यांकडून जोरदार टीका करण्यात आली. तसेच शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेरच जल्लोष केला.

यानंतर दुपारी पोलीस नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या घरी पोहोचले. त्यांना पोलीस ठाण्यात नेणार होते. पोलीस अधिकाऱ्यांसह पथक घरी गेल्यानंतर राणा दाम्पत्याने पोलीस ठाण्यात येणार नाही असे स्पष्ट शब्दांत सांगितले. त्यावर पोलीस अधिकारी त्यांच्याशी चर्चा करत होते. त्याचवेळी नवनीत राणा अचानक भडकल्या.

नियमाला धरून तुम्ही काम करा, तुमचा आवाज खाली करा, आवाज खाली करा. तुम्ही येथून निघून जा, असे त्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत बोलत होत्या. दुसरीकडे रवी राणा हे देखील कॅमेऱ्यासमोर संवाद साधत होते. आमच्यावर अन्याय होत आहे, हे सर्व जनता बघत आहे, असं रवी राणा बोलत होते.