कोलकाता: पश्चिम बंगालच्या राजकीय रणांगणात भारतीय जनता पक्षाने आतापासूनच विजयाची गणिते मांडायला सुरुवात केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या तीन दिवसांच्या सघन दौऱ्यात कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरतानाच ‘मिशन बंगाल’ यशस्वी करण्यासाठी पाच मुख्य मंत्रांचा आधार असलेला एक व्यापक ब्लूप्रिंट सादर केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत २९४ पैकी दोन-तृतीयांश जागा जिंकण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य भाजपने ठेवले असून, शाह यांच्या या रणनीतीमुळे बंगालमधील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत.
कार्यकर्त्यांना विजयाचे ५ ‘महामंत्र’
अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना स्पष्ट केले की, केवळ घोषणाबाजी करून चालणार नाही, तर जनतेच्या मनात स्थान निर्माण करण्यासाठी पाच महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर द्यावा लागेल. यामध्ये प्रामुख्याने घुसखोरांना बाहेर काढणे, ‘वंदे मातरम’चा सन्मान राखणे, ‘जय श्रीराम’च्या उद्घोषातून सांस्कृतिक अस्मिता जागवणे, ‘सोनार बांग्ला’ची निर्मिती आणि बंगालचा हरवलेला वारसा पुन्हा मिळवून देणे या गोष्टींचा समावेश आहे. हे पाच मुद्दे घेऊन भाजपचे कार्यकर्ते आता घराघरात पोहोचणार आहेत.
‘घुसखोरीमुक्त बंगाल’ हेच प्रमुख ध्येय
आपल्या भाषणात शहा यांनी घुसखोरीच्या मुद्द्यावरून तृणमूल काँग्रेस सरकारवर जोरदार हल्ला चढवला. “राज्यातील सत्ताधारी पक्ष केवळ लांगूलचालनाच्या राजकारणामुळे घुसखोरांकडे डोळेझाक करत आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला. केंद्रीय संस्थांनी दिलेल्या अहवालांवर स्थानिक पोलीस कारवाई करत नसल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. बंगालच्या सीमांची सुरक्षा आणि राज्याची स्थिरता यासाठी भाजपचे सरकार असणे अनिवार्य असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
भ्रष्टाचाराचे वाभाडे काढण्याचे आदेश
बंगालची ओळख एकेकाळी साहित्य, संस्कृती आणि समृद्धीसाठी होती, मात्र सध्याच्या सरकारने ती प्रतिमा मलिन केल्याचे शहा म्हणाले. कार्यकर्त्यांना सूचना देताना ते म्हणाले की, तृणमूल काँग्रेसच्या कार्यकाळातील कथित भ्रष्टाचार आणि घोटाळे जनतेसमोर उघड करा. “ज्या बंगालने देशाला दिशा दिली, तोच बंगाल आज भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकला आहे. ही परिस्थिती बदलून आपल्याला पुन्हा ‘सोनार बांग्ला’ घडवायचा आहे,” असे आवाहन त्यांनी केले. अमित शाह यांच्या या दौऱ्याने भाजपच्या निवडणूक मोहिमेला आता एक नवी धार प्राप्त झाली आहे.
