भाजपची ‘ती’ जखम अजुनही भळभळतीच! शाहांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा भाजपला फायदा होईल का?

WhatsApp Group

उत्तर प्रदेश, पंजाबसारख्या महत्वाच्या राज्यांमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. हे वारे महाराष्ट्राच्या दिशेनंही वाहू शकतात, असे संकेत गृहमंत्र्यांना महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान द्यायचे होते का? की महाविकास आघाडी सरकारचे सत्तेचे दोन वर्ष सरुनही सत्ता काबीज करण्यात आलेल्या अपयशाच्या वैफल्यातून त्यांनी हे आव्हान केलं?

देशाच्या गृहमंत्र्यांनी पुण्यातील कार्यक्रमात शिवसेनेवर तोफ डागली आणि पुन्हा मध्यावधी निवडणुकांची चर्चा रंगू लागली. सत्तेतून पायउतार व्हा आणि पुन्हा निवडणुकीत भाजपशी दोन हात करा, असं आव्हान अमित शाहांनी महाविकास आघाडी सरकारला दिलं. महाविकास आघाडीच्या २ वर्षांच्या सत्ताकाळात राज्यातील भाजप नेत्यांनी हे सरकार जाणार म्हणून अनेक मुहुर्त सांगितली. ही मुहुर्त कधीच टळली. मात्र, स्वत: केंद्रातल्या वजनदार नेत्यानं राज्यात येऊन महाविकासआघाडीला खुलं आव्हान देणं भविष्यातील बदलाची नांदी तर नाही ना, असं आपसुकच वाटून जातं.

उत्तर प्रदेश, पंजाबसारख्या महत्वाच्या राज्यांमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. हे वारे महाराष्ट्राच्या दिशेनंही वाहू शकतात, असे संकेत गृहमंत्र्यांना महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान द्यायचे होते का? की महाविकास आघाडी सरकारचे सत्तेचे दोन वर्ष सरुनही सत्ता काबीज करण्यात आलेल्या अपयशाच्या वैफल्यातून त्यांनी हे आव्हान केलं? राज्यात महाविकासआघाडीचं सरकार जरी सत्तेत असलं तरी भाजपची बाजूही भक्कम आहे. देवेंद्र फडणवीसांसारखा कणखर आणि अभ्यासू नेता विरोधी आवाज बुलंद ठेवून आहे. अशात भाजपच्या वरिष्ठ नेत्याच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर भाजप कार्यकर्त्यांच्या उत्साहात भर पडली आहे. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीनं घातलेलं लोटांगण पाहता येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला झुकतं माप मिळण्याची शक्यता जास्त आहे.

राज्यातील राजकीय वातावरण कितीही रंगात आलं असेल, तरीही सत्ताबदल सध्या राज्याला परवडणारा नाही. कोरोनामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यात ओमायक्रॉननं राज्यात थैमान घालायला सुरुवात केली आहे. महागाई, बेरोजगारी, नैसर्गिक संकटांनी पोळून निघालेल्या महाराष्ट्राला सध्या राजकीय स्थिरस्थावर होण्याची गरज जास्त आहे. कार्यकाळ संपत आल्यानं ५ राज्यांमधील निवडणुका होणं घटनेनुसार गरजेचंच आहे. मात्र, भाजपनं महाराष्ट्राच्या बाबतीत संयम बाळगायलाच हवा. महाविकास आघाडी सरकार पंक्चर ऑटो असल्याचं अमित शाह त्यांच्या भाषणात म्हणाले. या पंक्चर ऑटोला भंगारात पाठवायची त्यांची सुप्त इच्छा असल्यास २०२४ पर्यंत थांबण्याचा संयम त्यांनीही दाखवावा.

मराठा आरक्षण, ओबीसींचं संपुष्टात आलेलं राजकीय आरक्षण, एसटीचा संप या मुद्दांवरुन महाविकासआघाडी सरकारवर जनतेचा रोष आहे. त्यातच आरोग्य, शिक्षण विभागातील घोटाळ्यांमुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे. नेत्यांच्या दुर्लक्षामुळे आणि काही भ्रष्ट्र प्रवृतींमुळे सर्वसामान्यांचं नुकसान होत आहे. या आम आदमीचा भाजप आवाज बनल्यास भविष्यातील निवडणुकांमध्ये भाजपला त्याचा फायदाच होईल. राज्यातील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी शब्दांचा खेळ करताना परिस्थितीचं भान राखणंही गरजेचं आहे. मोदी लाटेत महाराष्ट्रात कधी नवे तो १०५ जागांचा टप्पा भाजपनं एकहाती गाठला. याच टप्प्याची चौकट बहुमतापर्यंत वाढवण्याची करामत भाजपनं २०२४ मध्ये करुन दाखवावी. तोपर्यत महाराष्ट्रात ३ चाकांचं सरकार आहे, हे सत्य स्वीकारावं.