प्रसिद्ध रेडिओ निवेदक अमीन सयानी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

WhatsApp Group

Ameen Sayani Death: प्रसिद्ध अभिनेते ऋतुराज यांचे काल निधन झाले. या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. आता मनोरंजन विश्वातून आणखी एक दुःखद बातमी समोर येत आहे. रेडिओ/ विविध भारतीचे सर्वांत प्रसिद्ध अनाऊंसर आणि टॉक शोचे निवेदक अमीन सयानी यांचं निधन झालं आहे. अमीन सयानी यांचे काल म्हणजेच मंगळवारी संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. अमीन सयानी यांचा मुलगा राजील सयानी यांनी त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली. अमीन सयानी यांच्या निधनाच्या वृत्ताने त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

अमीन सयानी यांचा मृत्यू कसा झाला?
दिवंगत अमीन सयानी यांच्या मुलाने सांगितले की, अमीन सयानी यांना मंगळवारी सायंकाळी 6.00 वाजता त्यांच्या दक्षिण मुंबईतील घरी हृदयविकाराचा झटका आला.हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांचा मुलगा राजील यांनी त्यांना तात्काळ दक्षिण मुंबईतील एच.एन. सयानी यांच्याकडे नेले. त्यांना रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात नेले असता उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

अमीन सयानी यांना कोणता आजार होता?
अमीन सयानी यांना उच्च रक्तदाब आणि वयोमानानुसार इतर आजार होते आणि त्यांना मागील 12 वर्षांपासून पाठदुखीचा त्रास होता.

रेडिओ सिलोन आणि विविध भारतीवर जवळपास 42 वर्षांपर्यंत चालणाऱ्या हिंदी गाण्यांचा त्यांचा कार्यक्रम ‘बिनाका गीतमाला’ने यशाचे सर्व विक्रम मोडले होते. लोक दर आठवड्याला त्यांचा आवाज ऐकण्यासाठी आतूर असायचे. ‘गीतमाला’सोबत उदयोन्मुख संगीत लँडस्केपची सखोल समज दाखवून संपूर्ण शो क्युरेट करणारे आणि सादर करणारे अमीन हे भारतातील पहिले होस्ट ठरले होते. या शोच्या यशामुळे सयानी यांचं रेडिओ विश्वात स्थान अधिक मजबूत झालं. अमीन सयानी यांना त्यांचे बंधू हमीद सयानी यांनी ऑल इंडिया रेडिओ इथं वयाच्या अकराव्या वर्षी कामाला लावलं होतं. अमीन यांना आधी गायक बनण्याची इच्छा होती.

‘भाइयों और बहनों’ या नेहमीच्या ओळीविरुद्ध ‘बहनों और भाइयों’ असं म्हणत संबोधित करण्याची त्यांची शैली त्याकाळात खूप प्रसिद्ध होती. “मैं समय हूँ..” हा महाभारत मालिकेतील त्यांचा आवाज आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. अमीन सयानी यांच्या नावावर तब्बल 54 हजारांपेक्षा जास्त रेडिओ कार्यक्रमांची निर्मिती/कम्पेअर/व्हॉईसओव्हर करण्याचा विक्रम आहे. जवळपास 19000 जिंगल्सना त्यांनी आवाज दिला आहे. यासाठी त्यांच्या नावाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे. त्यांनी भूत बंगला, तीन देवियाँ, कत्ल यांसारख्या चित्रपटांमध्ये अनाऊंसर म्हणून काम केलं होतं. रेडिओवर सेलिब्रिटींवर आधारित त्यांचा शो ‘एस कुमार्स का फिल्मी मुकादमा’ खूप लोकप्रिय झाला होता.