बापाच्या कष्टाचं चीज झालं! मुलाचं ‘अॅमेझॉन’चं ऑफर लेटर वाचताना पित्याचे डोळे पाणावले; संघर्षाची गोष्ट पाहून तुम्हीही व्हाल भावूक
वडिलांना अनेकदा कुटुंबाची मजबूत ढाल मानले जाते. परिस्थिती कितीही कठीण असली तरी ते स्वतःला सावरून धरतात आणि कुटुंबाची जबाबदारी शांतपणे पार पाडतात. मात्र, जेव्हा वर्षानुवर्षांच्या मेहनतीनंतर मुलाचे स्वप्न सत्यात उतरते, तेव्हा या कठोर वाटणाऱ्या माणसाच्या मनातील भावनांचा बांध फुटतो. असाच एक भावूक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणत आहे.
शैलेंद्रचा अॅमेझॉनपर्यंतचा प्रवास
ही गोष्ट शैलेंद्र नावाच्या एका तरुणाची आहे, जो एका शेतकरी कुटुंबातून येतो. शैलेंद्रने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याचे वडील त्याचे जॉब ऑफर लेटर वाचताना दिसत आहेत. शैलेंद्रची ही साधीसुधी नोकरी नाही, तर त्याला जगातील दिग्गज कंपनी अॅमेझॉन (Amazon) मध्ये SDE-2 या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. आपल्या कुटुंबातील तो पहिला इंजिनिअर आहे, त्यामुळे हा क्षण संपूर्ण कुटुंबासाठी ऐतिहासिक ठरला.
डोळ्यांत दाटले आनंदाश्रू
शैलेंद्रने बेंगळूहून दिल्लीला पोहोचून आपल्या वडिलांना हे सरप्राईज दिले. वडिलांनी जेव्हा आपल्या मुलाचे यश कागदावर वाचले, तेव्हा त्यांना स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही. त्यांच्या डोळ्यांत मुलाबद्दलचा अभिमान, आनंद आणि अनेक वर्षांच्या संघर्षातून मिळालेली मुक्ती अशा तिन्ही भावना एकाच वेळी पाहायला मिळाल्या. मर्यादित आर्थिक संसाधने असतानाही, वडिलांनी कधी हार मानली नाही. त्यांनी विविध प्रकारची कामे करून मुलाचे शिक्षण सुरू ठेवले आणि आज त्याचेच फळ त्यांना मिळाले आहे.
संघर्ष आणि जिद्दीची कहाणी
शैलेंद्रने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, त्याच्या वडिलांनी त्याला प्रत्येक कठीण परिस्थितीत पुढे जाण्यासाठी प्रेरित केले. हा विजय केवळ शैलेंद्रचा नाही, तर त्याच्या वडिलांच्या त्या अफाट कष्टांचा आहे जे त्यांनी मुलाच्या भविष्यासाठी उपसले होते. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, पालकांचे आपल्या आयुष्यातील महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित करत आहे.
