अल्लू अर्जुनने घेतला ‘Pushpa 2’साठी मानधन न घेण्याचा निर्णय, तरीही करोडोंची कमाई करणार

WhatsApp Group

लोकप्रिय तेलुगू अभिनेता अल्लू अर्जुन सध्या पुष्पा: द रुलच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सुकुमार या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. अभिनेत्याचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. याआधी 2021 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा पहिला भाग ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट अभिनय आणि सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचे दोन राष्ट्रीय पुरस्कारही जिंकले.

दरम्यान, त्याच्या सीक्वलबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार अल्लू अर्जुनने पुष्पाच्या सिक्वेलसाठी मानधन घेण्यास नकार दिला आहे. अभिनेत्याने चित्रपटाच्या कमाईतील नफ्यात वाटा मागितला आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर त्याने चित्रपटासाठी 33 टक्के नफा मागितला आहे. यामध्ये डिजिटल आणि सिनेमाच्या हक्काच्या रकमेचाही समावेश आहे.

या चित्रपटाबद्दल निर्मात्यांना पूर्ण विश्वास वाटत आहे. याच कारणामुळे निर्मात्यांनी पुष्पा 2 साठी परदेशी वितरकांकडून जवळपास 100 कोटी रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम एसएस राजामौली यांच्या आरआरआरपेक्षा कितीतरी जास्त आहे. पुष्पा 2 बद्दल बोलायचे तर, फहद फासिल, रश्मिका मंदान्ना, सुनील, प्रकाश राज, जगपती बाबू आणि इतर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. पुष्पा 2 पुढील वर्षी स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित होणार आहे.

याशिवाय अल्लू अर्जुनच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलताना, तो त्रिविक्रम श्रीनिवाससोबत AA22 साठी पुन्हा काम करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, हा एक पीरियड अॅक्शन फिल्म असेल आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यावर आधारित असेल.