मुस्तफिजुरची हकालपट्टी हा ठरवून केलेला कट!’ इमाम असोसिएशनचा बीसीसीआयवर संताप; शाहरुख खानचा केला बचाव
आयपीएल २०२६ च्या हंगामातून बांगलादेशचा स्टार गोलंदाज मुस्तफिजुर रहमान याला बाहेर काढण्याच्या निर्णयाने आता देशात मोठे राजकीय आणि धार्मिक वळण घेतले आहे. कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) मुस्तफिजुरला रिलीज केल्यानंतर ‘अखिल भारतीय इमाम संघ’ आक्रमक झाला आहे. संघाचे अध्यक्ष मौलाना साजिद रशीदी यांनी बीसीसीआयच्या या कारवाईवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले असून, हा निर्णय खेळाचा नसून ‘हिंदू-मुस्लिम’ राजकारणाचा भाग असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
“शाहरुख खानची काहीच चूक नाही”
मौलाना साजिद रशीदी यांनी स्पष्ट केले की, मुस्तफिजुर रहमानला लिलावात (Auction) खरेदी करणे हा केकेआरचे मालक शाहरुख खान यांचा कायदेशीर निर्णय होता. ते म्हणाले, “शाहरुख खानने बीसीसीआयच्या सर्व नियमांचे पालन करूनच खेळाडूवर बोली लावली होती. मग आता त्यांना विनाकारण ‘गद्दार’ ठरवले जात आहे. हा प्रकार अत्यंत चुकीचा असून शाहरुख खानला लक्ष्य करण्यासाठी हा कट रचला गेला आहे. जेव्हा खेळाडू लिलावात आला, तेव्हा त्याच्यावर कोणतेही निर्बंध नव्हते, मग आताच ही कारवाई का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
धर्माच्या आधारावर निर्णयाचा आरोप
इमाम असोसिएशनच्या मते, जर बांगलादेशातील परिस्थितीची बीसीसीआयला कल्पना होती, तर मुस्तफिजुरला लिलावाच्या यादीतून आधीच बाहेर का काढले नाही? रशीदी यांनी पुढे म्हटले की, “हा निर्णय केवळ हिंदू-मुस्लिम रंग देण्यासाठी घेतला गेला आहे. मुस्तफिजुर रहमान आणि शाहरुख खान दोघेही एकाच धर्माचे असल्यामुळे काही लोकांना हे सहन होत नाहीये. हे निव्वळ ‘इस्लामोफोबिया’ आणि मुस्लिमांविरुद्धचा द्वेष पसरवण्याचे लक्षण आहे.” देशातील काही लोक संविधानाचा विचार न करता केवळ द्वेषापोटी विरोध करत असल्याची टीकाही त्यांनी केली.
धर्मगुरुंच्या विरोधानंतर बीसीसीआयची कारवाई
या वादाची ठिणगी तेव्हा पडली जेव्हा प्रसिद्ध कथावाचक देवकी नंदन ठाकूर आणि जगद्गुरु स्वामी रामभद्राचार्य यांनी बांगलादेशी खेळाडूंच्या सहभागाला कडाडून विरोध केला होता. बांगलादेशातील हिंदूंच्या स्थितीचा हवाला देत त्यांनी हा विरोध दर्शवला होता. या दबावामुळे बीसीसीआयने शनिवारी तातडीने आदेश देऊन मुस्तफिजुरला संघातून बाहेर काढायला लावले. मात्र, इमाम असोसिएशनच्या या भूमिकेमुळे आता हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता असून, आगामी आयपीएल हंगामापूर्वी सोशल मीडियावर दोन तट पडल्याचे पाहायला मिळत आहे.
