गोदावरी, प्राणहिता पाणलोट क्षेत्रात नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

WhatsApp Group

मुंबई : गोदावरी व प्राणहिता नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नागपूर विभागात-गडचिरोली जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये २० मिमी. एवढा सरासरी पाऊस झाला असून जिल्ह्यातील वैनगंगा, प्राणहिता व वर्धा या नद्या इशारा पातळीच्या जवळपास वाहत आहेत तर गोदावरी नदी व इंद्रावती नदी या धोका पातळीच्या वर वाहत आहेत. सदर नद्या तुडुंब भरल्याने अनेक मार्ग खंडित झाले असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आला आहेत. जिल्ह्यात सध्या १० हजार ६०६ व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून त्यांच्यासाठी ३५ मदत केंद्रे उघडण्यात आली आहेत.

कालेश्वरम सरिता मापन केंद्रावरील नोंदीनुसार नदीची पाणी पातळी महत्तम पूर पातळीवरून वाहत आहे. लक्ष्मी बॅरेज (मेडीगड्डा) चे ८५ पैकी ८५ गेट उघडलेले आहेत.

गोदावरी व प्राणहिता नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. तरी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.