पोलिसांच्या सोयी-सुविधा व घरांसाठी अधिकचा निधी उपलब्ध करून देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

WhatsApp Group

शिर्डी – पोलीस दलाच्या आधुनिकीकरणा बरोबरच पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना सुसज्ज घरे मिळवून देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे‌. यासाठी पोलिसांच्या सोयी-सुविधांसाठी येत्या अधिवेशनात अधिकचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी आज येथे केले.

शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शिर्डी पोलीस ठाणे व शिर्डी येथील पोलीस अंमलदारांच्या ११२ निवासस्थानांच्या नूतन इमारतींचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार सुजय विखे-पाटील, आमदार किशोर दराडे, पोलीस महासंचालक (गृहनिर्माण) विवेक फणसळकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस उप महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, देश अमृत महोत्सव साजरा करत आहे. या निमित्ताने जीर्ण झालेल्या राज्यातील ७५ पोलीस ठाण्याचे बांधकाम करण्यात येईल. तसेच राज्यात पोलिसांच्या विविध गृहनिर्माण कार्यक्रमास ८६० कोटी उपलब्ध करून दिली आहेत. या निधीत पुरवणी मागण्यांमध्ये अधिक वाढ करण्यात येईल. असा शब्द मी आज राज्याच्या गृहमंत्र्यांना देतो.  पोलिसांसाठी ५३५ स्क्वेअर फुटांचे साडेसहा हजार फ्लॅट शासनाने राज्यात उपलब्ध करून दिले आहेत. या बांधकामांच्या दर्जात कुठेही तडजोड करण्यात आली नाही.

पोलीस दलाचे मनोबल उंचावण्यासाठी आधुनिक शस्त्रास्त्रे, संपर्क यंत्रणा, सीसीटीव्ही यंत्रणा व वेगाने धावणाऱ्या गाड्या या  सुसज्ज साधनांसोबत स्मार्ट पोलिसिंग व ई-ऑफिसचे काम करण्यात येत आहे.  याबरोबरच पोलीस दलाची मान खालावली जाईल, असे काम पोलिसांनी करू नये. असे ही उपमुख्यमंत्री अजित पवार या़नी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, गुन्हे कमी करण्यासाठी पोलीस दलासोबत इतर विभागांनीही एकमेकांमध्ये समन्वय ठेवून काम करावे. गुन्हे कमी झाल्यास राज्याचे उत्पन्न वाढते. जिल्हा नियोजन मधून पोलीसांना वाहने उपलब्ध करून देण्यात येतील.