”गोळीबार केला जातो, हात-पाय तोडण्याची भाषा केली जाते, अरे तुझ्या बापाच्या…’; अजित पवार संतापले

WhatsApp Group

गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीदरम्यान शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा प्रकार चर्चेत आला होता. त्यावरून विरोधकांनी शिंदे सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. अखेर सदा सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचं पिस्तुल जप्त करण्यात आलं. यासोबत इतर काही आमदारांकडूनही विरोधकांवर टीका करताना वादग्रस्त विधानं करण्यात आल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यावरून आता राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांचे चांगलेच कान टोचले आहेत. बीडमध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना, विशेषत: शिंदे गटाच्या आमदारांचा चांगलाच समाचार घेतला.

अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले,“अतीवृष्टीमुळे राज्यात मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्याला पीकविम्याचे पैसे मिळत नाहीत. त्याचं उत्तर देत नाहीत. त्याचं उत्तर द्या ना. सत्तेची मस्ती, नशा आणि धुंदी उतरवण्याची ताकद राज्याच्या मतदारांमध्ये आहे हे या सरकारने लक्षात घ्यावं. आम्हीही लक्षात ठेवतो. आम्हीही काही ताम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाही. पण काय पद्धतीचं राजकारण सुरू आहे. तु्म्ही सांगितलं होतं लगेच पैसे देतो. दिले का पैसे?” असा सवाल अजित पवारांनी यावेळी केला.

सत्ताधारी आमदारांकडून केल्या जात असलेल्या विधानांचा यावेळी अजित पवारांनी चांगलाच समाचार घेतला. “गेल्या तीन महिन्यांत कायदा-सुव्यवस्था ढासळली आहे. सत्ताधारी पक्षाचेच आमदार मुंबईमध्ये गोळीबार करत आहेत. सरकारमधले आमदारच गोळीबार करत असतील तर जनतेनं न्याय मागायचा कुणाकडे? हे तर आक्रितच झालं”, असं ते म्हणाले.

कोण चुकीचं वागत असेल, तर त्यांना शासन केलं गेलं पाहिजे. पण तसं होत नाही. गोळीबार केला जातो. त्यांचे लोक शिवीगाळ करतात. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? काही तर आमदार हात-पाय तोडण्याची भाषा करतात. त्यांच्या मेळाव्यात आमदाराने सांगितलं विरोधकांचे हात-पाय तोडा. कुणी तुमच्यामागे आलं तर मी उभा आहे. अरे काय तुझ्या बापाच्या घरचं आहे का? हे तुम्ही कसं बोलू शकता?” असा परखड सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे.”इतर राज्यांमध्ये तशा घटना घडतात. पण महाराष्ट्राला त्या पातळीवर न्यायचंय का?” असंही अजित पवार यावेळी म्हणाले.