खराब आऊटफिल्डमुळे नाणेफेकीला उशीर, इशांत, रहाणे आणि जडेजा मुंबई कसोटीतून बाहेर

WhatsApp Group

मुंबई – भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना आजपासून मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवला जाणार आहे. सामन्याची नाणेफेक सकाळी 9 वाजता होणार होती, परंतु पाऊस आणि खराब आऊटफिल्डमुळे नाणेफेकीला उशीर होणार आहे.

दुसऱ्या सामन्याआधी बीसीसीआयने दिलेल्या माहितीनूसार इशांत शर्मा, रवींद्र जडेजा आणि अजिंक्य रहाणे या दिग्गज खेळाडूंना दुसऱ्या कसोटीतून वगळण्यात आले आहे. तर न्यूझीलंड कर्णधार केन विल्यमसनही या सामन्याला मुकणार आहे. अशी माहिती न्यूझीलंडने दिली आहे.

पहिली कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर मुंबईत चांगली कामगिरी करून मालिका जिंकण्याकडे दोन्ही संघांच्या नजरा असतील. भारतीय कर्णधार विराट कोहलीही मुंबई कसोटीतून भारतीय संघात पुनरागमन करणार आहे.

हवामान खात्याने दिलेल्या महितीनुससार, मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. बुधवारीही दिवसभर पाऊस पडल्याने दोन्ही संघांना सरावही करता आला नव्हता. ओल्या आउटफिल्डमुळे दोन्ही संघांनी वांद्रे कुर्ला येथे इनडोअर सराव केला. वानखेडेच्या खेळपट्टीवर गवत अजिबात नाही, ज्यामुळे मध्यम वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूंना मदत होईल.

भारतीय संघाने वानखेडे मैदानावर आजवर एकूण 25 कसोटी सामने खेळले असून यातील 11 सामने जिंकले आहेत तर 7 सामन्यांमध्ये पराभव स्विकारावा लागला आहे. या मैदानावर शेवटचा कसोटी सामना 2016 मध्ये खेळला गेला होता, त्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा एक डाव आणि 36 धावांनी पराभव केला होता. चांगली गोष्ट म्हणजे गेल्या 9 वर्षांपासून भारतीय संघ या मैदानावर एकदाही हरला नाही.

न्यूझीलंडबद्दल बोलायचे झाले तर वानखेडे मैदानावर त्यांनी फक्त दोन कसोटी सामने खेळले आहेत. यातील 1 सामना न्यूझीलंडने जिंकला असून 1 सामना गमावला आहे. या मैदानावर 1988 मध्ये न्यूझीलंडने 136 धावांनी कसोटी सामना जिंकला होता.