Duleep Trophy 2022: चर्चा तर होणारच! अजिंक्य रहाणेने ठोकले द्विशतक… टीकाकारांना दिले चोख प्रत्युत्तर

WhatsApp Group

Duleep Trophy 2022: टीम इंडियाच्या कसोटी संघातून बाहेर असलेला अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेने दुलीप ट्रॉफीमध्ये द्विशतक ठोकून टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. पश्चिम विभागाचा कर्णधार असलेल्या अजिंक्य रहाणेने उत्तर पूर्व विभागाविरुद्धच्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी द्विशतक झळकावले. रहाणे दुखापतीनंतर पुनरागमन करत आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेतून त्याला वगळण्यात आले होते.

अजिंक्य रहाणेने यशस्वी जैस्वालसह दुसऱ्या विकेटसाठी 333 धावांची भागीदारी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पश्चिम विभागाने पहिल्या डावात 2 बाद 590 धावा केल्या. रहाणे 264 चेंडूत 207 धावा करून नाबाद आहे. रहाणेने या खेळीत 18 चौकार आणि 6 षटकार मारले आहेत.

सलामीवीर पृथ्वी शॉने 121 चेंडूत 11 चौकार आणि 5 षटकारांसह 113 धावा केल्या. यशस्वी जैस्वालने 321 चेंडूत 228 धावांची धडाकेबाज खेळी खेळली. पृथ्वी आणि यशस्वीने पहिल्या विकेटसाठी 206 धावांची भागीदारी केली. रहाणेने 254 चेंडूत द्विशतक तर 135 चेंडूत शतक झळकावले.