दशांगुळे ‘एजाज’ पटेल…!

WhatsApp Group

भारतीय वंशाच्या परंतु भारतीय राष्ट्रीय नसलेल्या एजाज पटेल याने आज एक विक्रम बरोबरीत आणला. एका डावात दहा बळी त्याने मिळवले हा तो विक्रम. बरोबरीत यासाठी की एक गोलंदाज एक वेळेस दहाच बळी मिळवू शकतो, अकरा नाही, त्यामुळे हा विक्रम ‘मोडणे’ हे कोणालाही जमणार नाही. त्याअर्थाने हा विक्रम देखील दुर्मिळ आणि म्हणूनच अधिक मूल्यवान आहे.

एका गोलंदाजाला मुळातच कसोटीत अधिक बळी मिळवणे हे ‘शक्य’ असते. अर्थातच त्यामागे एकदिवसीय क्रिकेटमध्ये असणारे षटकांचे बंधन नसणे हे महत्वाचे कारण. तुलनेत अजूनही बॉलर्सच्या बाजूने असलेला हा खेळ प्रकार. अर्थातच हे शक्य असते म्हणून ‘सहज’ असते असेही नाही. पाच बळी मिळवणे देखील जिथे उत्कृष्ट आणि हल्ली दुर्मिळ म्हटले जाते तिथे दहा बळींचे मोल आपोआपच वाढते. त्यामुळे हा दुर्मिळ विक्रम करणारा पटेल केवळ तिसराच गोलंदाज ठरला यात नवल कोणते?

इंग्लंडचे गोलंदाज जिम लेकर हे या विक्रमाचे आद्य विक्रमवीर. १९५६ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना जिम लेकर यांनी सर्वप्रथम एका डावात दहा बळी मिळवले. एरवी बॅट्समनचा खेळ म्हणून हिणवला जाणारा क्रिकेट अशावेळी मात्र भलताच गोलंदाजीच्या बाजूने झुकलेला वाटू लागतो. जिम यांनी पहिल्या डावात सदतीस धावा देऊन नऊ बळी मिळवले तर दुसऱ्या डावात अक्षरशः धुमाकूळ घालत ५३ धावांत १० बळी मिळवले. दहा बळी एका डावात याबरोबरच कसोटीत १९ बळी हा सर्वार्थाने अद्भुत विक्रम त्यांनी रचला. “लेकर्स मॅच” या नावाने हा कसोटी सामना ओळखला जातो.

तब्बल ४३ वर्षांनी भारताच्या अनिल कुंबळेने हा विक्रम स्पर्श केला.१९९९ साली दिल्लीतील फिरोजशहा कोटला मैदानावर दुसऱ्या कसोटीत अनिल कुंबळेने पाकिस्तानी संघाला एकहाती धूळ चारली. दिल्लीतील प्रचंड थंडीत ऐन फेब्रुवारीत पाकिस्तानला कुंबळेने फोडलेला घाम सर्वर्थाने प्रेक्षणीय दृश्य होते. मुळातच कुंबळे हा काही चेंडू वळवणारा स्पिनर नव्हता, त्यामुळे अन्य तिखट लेग स्पिनर्सच्या आजूबाजूला असते तसे वलय त्याला नव्हते. सरळसोट चेंडू, तेही स्पिनरला न शोभणार्या वेगाने, टाकणारा गोलंदाज असलेल्या कुंबळेने त्या दिवशी फिरोजशहा कोटला पेटवले! अर्थात त्याच्या या विक्रमाच्या मागे त्याचा खास मित्र जवागल श्रीनाथचेही योगदान होते. अन्य देशांकडे असलेली खिलाडूवृत्तीचा अभाव ही पाकिस्तानची विशेषता. त्याला जागत वकार युनूसने शेवटचा बळी कुंबळेला मिळू नये यासाठी मनापासून प्रयत्न केले, त्यात श्रीनाथच्या गोलंदाजीवर स्वतःहून विकेट फेकण्याची तयारी केली होती. अर्थात श्रीनाथने ही चाल ओळखून आपले षटक पूर्ण करत बळी देण्याचा वकार प्रयत्न हाणून पाडला. पुढे वसीम अक्रमला पायचीत करत कुंबळेने दहावा बळी मिळवला.

दिवसेंदिवस फलंदाजधार्जिणे नियम होत चाललेल्या क्रिकेटमध्ये पुन्हा असा विक्रम होईल का असे वाटत असतानाच आज न्यूझीलंडच्या एजाज पटेल या खेळाडूने एका डावात दहा बळी मिळवले. भारतीय क्रिकेटच्या पंढरीत, मुंबईत वानखेडेत, त्याने हा विक्रम केला हे विशेष. आयुष्यभर फिरकी बॉलिंग खेळत वाढलेले भारतीय फलंदाज या सापळ्यात अडकणे हे देखील आपल्या दृष्टीने लाजिरवाणे, परंतु त्यामुळे पटेलच्या कामगिरीचे महत्व कमी होत नाही, उलट ते वाढतेच!

खरे तर हा पटेल जन्माने मुंबईकर! मुंबईच्या मैदानात वाढलेल्या आणि चेंडू वळवायला शिकलेल्या पटेल ने आई वडिलांसोबत न्यूझीलंड गाठले आणि पुढे त्याला त्या देशाच्या संघात संधी देखील मिळाली. भारतीय वंशिय असून भारताविरुद्ध त्याने दहा बळी मिळवले ते असे! सर्वार्थाने दुर्मिळ विक्रम पंगतीत तो आता जाऊन बसला आहे. केवळ या कामगिरीमुळे तो जन्मभर क्रिकेटप्रेमींच्या लक्षात राहणार आहे. अर्थात आपली ओळख तितकीच मर्यादित ठेवायची आहे की अजून चांगले करायचे आहे हे त्याचे निर्णय आहे. त्याबाबतीत (देखील) त्याच्यापुढे अनिल कुंबळेचा आदर्श आहे. दहा बळी मिळवणारा गोलंदाज याबरोबरच कसोटीत ६१९ बळी, तेही भारतीय उपखंडात खेळून मिळवणारा, गोलंदाज ही त्याची ओळख अधिक ठळक म्हणावी अशी, त्याच्या महानतेला साजेशी. एजाज पुढे ती आहे, किंवा रेकॉर्ड पुस्तकात कायमचा बंदिस्त होऊन नामशेष होण्याची! तूर्तास अभिनंदन एजाज पटेल.