
अहमदाबाद – एअर इंडियाच्या बोईंग 787 विमानाला उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या १० मिनिटांत मोठा अपघात झाला. लंडनकडे जाणाऱ्या या विमानाने अहमदाबाद विमानतळावरून दुपारी 1.23 वाजता उड्डाण घेतल्यानंतर केवळ १६ मिनिटांतच, म्हणजे 1.39 वाजता, ते शहरातील एका इमारतीवर कोसळले. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, अपघाताचा एक धक्कादायक व्हिडिओही समोर आला आहे.
विमानात २४२ प्रवासी; विजय रुपाणीही होते प्रवाशांमध्ये
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या विमानात एकूण २४२ प्रवासी प्रवास करत होते. विशेष म्हणजे, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील या विमानात प्रवास करत होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र, त्यांच्या सुरक्षिततेबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.
पायलटने दिला होता आपत्कालीन संदेश
डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल अॅव्हिएशन (DGCA) ने दिलेल्या माहितीनुसार, या विमानाचे पायलट सुमित सभरवाल हे अत्यंत अनुभवी असून त्यांना 8200 तासांपेक्षा अधिकचा उड्डाणाचा अनुभव आहे. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणांतच पायलटने “मेडे” (आपत्कालीन) संदेश पाठवला होता. त्यानंतर विमानाशी संपर्क तुटला आणि काही वेळातच त्याच्या अपघाताची माहिती समोर आली.
तांत्रिक बिघाडाची शक्यता
DGCA च्या प्राथमिक तपासानुसार, या दुर्घटनेमागे तांत्रिक बिघाड कारणीभूत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विमान उड्डाण घेतल्यानंतर इंजिनमध्ये काही अडचण आल्याचं पायलटला जाणवलं आणि त्याने तत्काळ आपत्कालीन संदेश दिला. दुर्दैवाने, त्यानंतर कोणताही संपर्क होऊ शकला नाही आणि विमान थेट शहरातील एका इमारतीवर कोसळले.
व्हिडिओ फुटेज समोर
या दुर्घटनेनंतर काही स्थानिकांनी घटनेचे धक्कादायक व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केले असून ते सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दुर्घटनेनंतर मोठ्या प्रमाणात अग्निशमन दल आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
सरकारी यंत्रणा सतर्क, चौकशी सुरू
घटनेनंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावली असून, एनडीआरएफ आणि अन्य आपत्कालीन यंत्रणांना घटनास्थळी पाठवण्यात आलं आहे. DGCA आणि एअर इंडियाने यासंबंधी अधिकृत चौकशी सुरू केली आहे.
या अपघातात नेमकी किती जीवितहानी झाली आहे, याबाबत अद्याप अधिकृत आकडेवारी हाती आलेली नाही. मात्र, घटनेच्या गांभीर्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.