ठिबक व तुषार सिंचन प्रणालीबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण आवश्यक – कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

WhatsApp Group

मुंबई : ठिबक व तुषार सिंचन संचाचे वितरण करताना त्याची पूर्ण माहिती शेतकऱ्यांना देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना ही प्रणाली कशी वापरावी याचे प्रशिक्षण या संचाचे वितरण करणाऱ्या साहित्य विक्रेत्यांनी द्यावे, असे निर्देश कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे राष्ट्रीय कृषी विकास योजना : प्रति थेंब अधिक पीक (ठिबक व तुषार) अंमलबजावणी संदर्भात झाली. या बैठकीला कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, ईरीगेशन असोसिएशनचे अध्यक्ष  झुंबरलाल भंडारी यांच्यासह संघटनेचे सदस्य, कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे म्हणाले की, ठिबक आणि तुषार सिंचन संचाचे वितरण कंपन्यांद्वारे केले जाते. या योजनांमध्ये, शेतकऱ्यांना अनुदान आणि सवलती मिळतात. पाणी वाचवण्यासाठी आणि पिकांची गुणवत्ता सुधारण्यासाठी ठिबक सिंचन उपयुक्त आहे, तर तुषार सिंचन मोठ्या क्षेत्रांसाठी योग्य आहे. ठिबक व तुषार सिंचन संच शेतात बसविल्यानंतर त्याचा योग्यप्रकारे वापर होणे गरजेचे आहे. तसेच जास्त कालावधीपर्यंत ही यंत्रणा शेतकऱ्यांना वापरता यावी यासाठी हे संच वापरण्याचे कौशल्य विकसित होणे गरजेचे आहे. ज्या कंपन्या शेतकऱ्यांना याबाबत योग्य ते प्रशिक्षण देणार असतील त्या कंपन्यानाच शासन अनुदान देण्यासंदर्भात प्राधान्यक्रम निश्च‍ित करेल असेही कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.