कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्र, गोवा आणि लगतच्या प्रदेशातील बेरोजगार तरुणांना भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी “ऑनलाईन सामाईक प्रवेश (CEE)/ भरती रॅली वर्ष 2024-25″अधिसूचना www.joinindianarmy.nic.in संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी दिनांक 13 फेब्रुवारी पासून दिनांक 22 मार्च 2024 पर्यंत अर्ज करावयाचा आहे.
भरती प्रक्रिया दोन टप्प्यात होणार आहे. टप्पा क्र.1 मध्ये ऑनलाईन संगणक आधारित लेखी परीक्षा (ऑनलाईन CEE) नामनिर्देशित सिबिटी केंद्रावर होणार आहे. अग्निवीर ऑफिस असिस्टंट व एसकेटी साठीच्या उमेदवारांसाठी टायपिंग टेस्ट समाविष्ट करण्यात आली असून ऑनलाईन CEE दरम्यान घेतली जाणार आहे.
रॅलीच्या ठिकाणी सैन्य भरती कार्यालयाकडून टप्पा क्र.2 भरती रॅली मध्ये अनुकूलता चाचणी समाविष्ट करण्यात आली आहे, जी वैद्यकीय चाचणीपूर्वी घेतली जाईल. उमेदवारांनी अनुकूलता चाचणीसाठी पुर्ण बॅटरी चार्ज असलेला आणि 2 GB डेटासह क्षमतेचा स्मार्ट फोन आणणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी भरती अधिसूचनेचे सर्व तपशील पाहण्यासाठी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन आर्मी रिक्रुटींगचे संचालक आकाश मिश्रा यांनी केले आहे.