Ravindra Jadeja Retirement : विराट-रोहितनंतर आता जडेजानेही टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती

WhatsApp Group

Ravindra Jadeja Retirement T20 : 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाचे दिग्गज या फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा करत आहेत. विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मानंतर आता अष्टपैलू रवींद्र जडेजानेही टी-20 फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. रवींद्र जडेजाने सोशल मीडियाच्या माध्यमातून टी-20 मधून निवृत्ती जाहीर केली आहे. मात्र, भारतीय संघाकडून वनडे आणि कसोटी सामने खेळत राहणार असल्याचे रवींद्र जडेजाने स्पष्ट केले आहे. रवींद्र जडेजा म्हणाला की, टी-20 विश्वचषक जिंकणे हे त्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

भारतीय क्रिकेट संघाच्या तीन खेळाडूंनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप देतानाच देशवासीय टी-20 विश्वचषकाच्या विजयाचा आनंद साजरा करत होते. फलंदाज विराट कोहलीने सर्वप्रथम निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मानेही मोठी घोषणा करतटी-20 ला अलविदा केला. आता अष्टपैलू रवींद्र जडेजानेही निवृत्ती जाहीर केली. मात्र, हे तिन्ही खेळाडू कसोटी आणि वनडेमध्ये दिसणार आहेत.

रवींद्र जडेजाने 2009 साली श्रीलंकेविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. रवींद्र जडेजाने 74 टी-20 सामन्यांच्या 41 डावांमध्ये 515 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 21.46 आणि स्ट्राइक रेट 127.16 होता. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 46 धावा आहे. गोलंदाजीत रवींद्र जडेजाने 71 टी-20 डावात एकूण 54 विकेट घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये त्याची सरासरी 29.85  आहे. 15 धावांत 3 बळी ही त्याची गोलंदाजीतील सर्वोत्तम आकडेवारी आहे. अनेक मोठ्या प्रसंगी रवींद्र जडेजाने आपल्या क्षेत्ररक्षणाने संघाला सामने जिंकून दिले आहेत.