शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंना पहिलं यश, सोलापुरात ग्रामपंचायत निवडणूक जिंकली

WhatsApp Group

सोलापूर : शिवसेनेतील बंडखोरी आणि फुटीनंतर उद्धव ठाकरेंना पहिले यश मिळाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील चिंचपूर आणि मांगोली ग्रामपंचायत निवडणुकीत ठाकरे सेनेने भगवा फडकवला आहे. महाराष्ट्रात सरकार बदलल्यानंतर आज (5 ऑगस्ट, शुक्रवार) ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणूक निकालांनुसार सोलापूर जिल्ह्यातील चिंचपूर ग्रामपंचायतीमध्ये उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. म्हणजेच उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचे 7 पैकी सात उमेदवार विजयी झाले आहेत.

दुसरीकडे दक्षिण सोलापूरच्या मांगोली ग्रामपंचायतीतही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने भाजपच्या सुभाष देशमुख यांना मोठा धक्का दिला आहे. येथे भाजपला सहापैकी केवळ एका जागेवर विजय मिळाला आहे. माढा तालुक्यातील म्हैसगाव ग्रामपंचायतीवर आमदार बबनराव शिंदे समर्थक व विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष वामनभाऊ यांच्या गटाची सत्ता कायम आहे. मात्र पडसाळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रताप पाटील यांच्या गटाला पराभवाला सामोरे जावे लागले.

राज्यात सरकार बदलल्यानंतर गुरुवारी 15 जिल्ह्यांतील 238 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्यापैकी सोलापूर जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवत उद्धव गटातील शिवसेनेने भाजपला मोठा धक्का दिला आहे.