नगरपंचायत निकालानंतर शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा, सेना कार्यकर्त्याच्या बहिणीचा मृत्यू
धुळ्यातील साक्री नगरपंचायात निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तिथे शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. साक्री नगरपंचायत भाजपच्या ताब्यात गेल्यानंतर ही हाणामारी झाली आहे. भाजपने विजय झाल्यानंतर जल्लोष साजरा करत असताना तेथून जाणाऱ्या शिवसेना कार्यकर्त्यांसोबत वाद झाला. या झालेल्या वादात शिवसेना कार्यकर्त्याच्या बहिणीचा मृत्यू झाला आहे.
साक्री नगरपंचायतीत प्रभाग 11मध्ये भाजपचा उमेदवार विजयी झाला तर शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला. यावेळी विजयी उमेदवार आणि शिवसेनेचे पराभूत उमेदवार यांच्या परिसरात दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. दरम्यान, शिवसेना कार्यकर्त्याच्या बहीणीने बचाव करण्याचा प्रयत्न केला. यात कार्यकर्त्याच्या बहीणीला मार बसल्याने त्या गंभीर झाल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. मोहिनी नितीन जाधव असं त्या महिलेच नाव आहे.
दरम्यान आता मोहिनी जाधव यांचे नातेवाईक संतप्त झाले आहेत. त्यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. गुन्हेगारांना अटक होतं नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही असा इशारा नातेवाईकांनी दिला आहे. या प्रकरणात विजयी उमेदवार आणि भाजप कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचा आरोप नातेवाईक करत आहेत.