
कोरोनामुळे ( Covid-19 ) आधीच संकटात असलेल्या जगावर आता नवीन संकट निर्माण झाले आहे. सध्या मंकीपॉक्स (Monkeypox Virus ) या विषाणूंची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या 10 दिवसात जगातील 12 देशांमध्ये या विषाणूची लागण झालेले 92 रुग्ण समोर आले आहेत. आफ्रिका, युरोपच्या 9 देशांसह अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये देखील मंकीपॉक्सचे रुग्ण आढळून आले आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने ( WHO ) चिंता व्यक्त करत सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
आतापर्यंत एकूण 12 देशांमध्ये मंकीपॉक्सची प्रकरणं समोर आली आहेत. संक्रमणाचे गांभीर्य लक्षात घेत आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि आयसीएमआरला परिस्थितीवर करडी नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सचे प्रकरण आढळून आल्यानंतर आपल्या देशातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. भारतामध्ये येणाऱ्या आफ्रिकन नागरिकांची एअरपोर्टवरच तपासणी करत लक्ष ठेण्यात येत आहे. गरज भासल्यास संशयितांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वयारोलॉजीमध्ये पाठविण्यात येऊ शकतात.